‘स्वाभिमानी’ची १७ सप्टेंबरला आक्रोश पदयात्रा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:10+5:302021-09-15T04:39:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मागील काही दिवसांपूर्वी सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी नदी, नाले, ओढे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील काही दिवसांपूर्वी सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी नदी, नाले, ओढे, बंधारे तलाव फुटून पिकांसह शेती वाहून गेली आहे, तर, पाण्याचा निचरा झालेला नसल्यामुळे पिके पिवळी पडून त्याचे उत्पन्न अत्यल्प होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कचेरीवर ६० किलोमीटर पायी चालत आक्रोश पदयात्रा काढण्यात येणार आहे.
पदयात्रेस १५ सप्टेंबर रोजी वडवणी तालुक्यातून सुरुवात होणार असून, ही शेतकऱ्यांची आक्रोश पदयात्रा १७ सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीवर धडकणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी यासह इतर मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर करपे यांनी विविध गावांमध्ये जनजागृती सभा घेतली असून, मोठ्या संख्येने या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
...
या मार्गावरून निघणार पदयात्रा
१५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता सुर्डी थोट येथून या आक्रोश पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पिंपळादेवी, लिंबारुई, पाटेगाव, बेडकूचिवडी, पिंपळनेर, बेलवाडी, बाभूळवाडी, ईट, म्हाळसापूर, जवळा, खांडेपारगाव, उमरी फाटा, अंथरवन पिंपरी येथे मुक्काम होणार आहे. १७ सप्टेंबर सकाळी ७ वाजता अंथरवणपिंपरी (ता. जि.बीड) यामार्गे बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर, आकाशवाणी, जुना मोंढा, बालाजी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, बशीर गंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगररोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे.