‘स्वाभिमानी’ची आक्रोश पदयात्रा आज बीडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:42+5:302021-09-17T04:40:42+5:30
बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने ...
बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने तत्काळ मदत म्हणून द्यावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडवणी तालुक्यातून बीडपर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी आक्रोश पदयात्रा बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली.
चिंचोटी येथून निघालेली ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच छोटे मोठे नदी, नाले, ओढे ,बंधारे तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटून वाहिल्याने शेतकऱ्यांची शेती पिकांसह वाहून गेली आहे. तसेच शेतात पाणी साचून ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. गतवर्षीचा थकीत खरीप पीकविमा तत्काळ वाटप करावा, यासह इतर मागण्यांसाठी ६० किलोमीटर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे. या पदयात्रेत वडवणी तालुकाध्यक्ष अतुल झाटे, लहू गायकवाड, मुन्ना गोंडे, रामनाथ महाडिक, कैलास थोटे, महादेव गोंडे, माऊली आगे, उद्धव साबळे, परमेश्वर वीर यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
शेतकऱ्यांना समस्यांमधून मुक्त करा
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला आहे. त्यामुळे मराठवाडा ज्याप्रमाणे जुलमी राजवटीतून मुक्त झाला. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व इतर मागण्या पूर्ण करून त्यांचीदेखील या जुलमातून सुटका करावी, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी सांगितले.
160921\16_2_bed_10_16092021_14.jpg
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश यात्रा काढण्यात आली यावेळी पूल नसल्याने शेतकऱ्यांनी नदीपात्रातून वाट काढली