स्वप्निलचे रुग्णसेवेचे स्वप्न अधुरे; संवेदनशील, गुणी स्वभावामुळे परिचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:25+5:302021-08-19T04:37:25+5:30
बीड : स्वप्निल अभ्यासात लहानपणापासूनच गुणी होता...वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे त्याचे स्वप्न होते. यातून त्याला रुग्णांची सेवा करायची होती, पण ...
बीड : स्वप्निल अभ्यासात लहानपणापासूनच गुणी होता...वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे त्याचे स्वप्न होते. यातून त्याला रुग्णांची सेवा करायची होती, पण आता त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मात्र, दुर्दैवाने हे वास्तव असून ते मान्य करावे लागणार आहे. महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे एकुलत्या एका मुलाला गमवावे लागले, अशा शब्दांत डॉ. स्वप्निल शिंदे याचे वडील महारूद्र शिंदे यांनी भावनांना वाट मोकळी केली.
नाशिकच्या डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये १७ ऑगस्टला एमडीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा डॉ. स्वप्निल शिंदे (२६, रा. श्रीरामनगर, बीड) याचा संशयास्पद मृत्यू झाला. या महाविद्यालयातील चार सिनीयर विद्यार्थिनी त्याो रॅगिंग करत. त्यातून त्याचा घातपात झाल्याचा आरोप स्वप्निलच्या कुटुंबीयांनी १८ ऑगस्टला केला. डॉ. स्वप्निलचे वडील महारुद्र शिंदे हे कंत्राटदार आहेत. मूळचे देवपिंप्री (ता.गेवराई) येथील शिंदे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये राहतात. महारुद्र यांच्या पत्नी सत्यशीला या गृहिणी आहेत. स्वप्निल त्यांचा एकुलता एक मुलगा होता. बालपणापासून त्याच्यावर आई-वडिलांनी योग्य ते संस्कार केले. सेंट ॲन्स स्कूलमध्ये त्याने प्राध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण घेतले. एमडीच्या द्वितीय वर्षात तो शिकत होता. वर्षभरानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून तो महाविद्यालयातून बाहेर पडला असता. मात्र, दुर्दैवाने तो रॅगिंगचा बळी ठरला. चार सिनिअर विद्यार्थिनींकडून त्याचा छळ सुरू होता. याबाबत त्याने घरी तक्रार केली होती. त्यानंतर महिनाभरापासून त्याची आई सत्यशीला या त्याच्यासोबत नाशिक येथे राहत. दरम्यान, १७ ऑगस्टला सायंकाळी तो महाविद्यालयात गेला. आंतररुग्ण विभागातील एका रुग्णाची भेट घेतल्यानंतर स्वच्छतागृहात तो काेसळला. त्यानंतर त्यास याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, काही वेळांतच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनाबद्दल आईला माहिती दिली गेली तर वडिलांना मित्रांकडून कळाले. संवेदनशील व गुणी मुलगा गेल्याच्या बातमीने त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला.
....
दोन महिन्यांपूर्वी आला होता घरी
डॉ.स्वप्निल शिंदे हा दोन महिन्यांपूर्वी बीडला घरी आला होता. त्याने रॅगिंगबाबत आई-वडिलांना सांगितले होते. त्यानंतर आई-वडिलांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांना भेटून कळविले होते. १७ जूनला तो नाशिकला परत गेला. मात्र, त्याचा रॅगिंगच्या तक्रारीने आई सत्यशीला या नाशिकला त्याच्याकडे राहत. तो आत्महत्या करू शकत नाही, त्याचा घातपातच झाल्याचा दावा वडील महारुद्र शिंदे यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी केली.
....
असह्य अपमान... मानसिक त्रास
महारुद्र शिंदे म्हणाले, स्वप्निलची रॅगिंग करणाऱ्या मुली त्यास सतत अपमानित करत. मानसिकरीत्या त्रास देत. त्यामुळे तो नैराश्येत जाऊ नये म्हणून मी प्रोत्साहन देत असे. १७ रोजी सकाळी त्यास एक मोटिव्हेनशल व्हिडिओ पाठविला होता शिवाय फोन करुन विचारपूसही केली होती. मात्र, हा फोन शेवटचा असेल असे कधी वाटले नाही, असे सांगताना महारुद्र शिंदे यांना हुंदका आवरता आला नाही.
....
180821\18bed_35_18082021_14.jpg
स्वप्नील शिंदे