‘स्वाराती’ला एंडोस्कोपी युनिटसाठी ८८ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:05+5:302021-06-09T04:42:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन ...

Swarati gets Rs 88 lakh for endoscopy unit | ‘स्वाराती’ला एंडोस्कोपी युनिटसाठी ८८ लाखांचा निधी

‘स्वाराती’ला एंडोस्कोपी युनिटसाठी ८८ लाखांचा निधी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मायक्रो डिब्रायडर एंडोस्कोपी युनिट खरेदी करण्यासाठी ८८ लाखांचा निधी दिला आहे. पोस्ट कोविड उपचारांमध्ये म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी हे युनिट फायदेशीर ठरणार आहे.

म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करताना आवश्यक एंडोस्कोपी सर्जरी करण्यासाठी मायक्रो डिब्रायडर एंडोस्कोपी युनिट अत्यंत लाभदायक आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ४२ हजार ७८२ यूएस डॉलर्स इतकी किंमत आहे. या युनिटसह ९.३६ लाख रुपये किमतीचे १९ इन्फ्युजन पंप खरेदीसाठी एकूण ८८ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करून दिला असल्याची माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.

स्वाराती रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ९० रुग्णांवर ११५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बीडसह नांदेड, उस्मानाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यातून देखील या आजाराचे रुग्ण येथे उपचार घ्यायला येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी शस्त्रक्रिया करणारे ‘स्वाराती’ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे.

डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. सुधीर भिसे यांच्यासह या विभागातील सर्व निवासी डॉक्टरांच्या नेतृत्वात म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील या सर्वच टीमचे धनंजय मुंडे यांनी कौतुक केले आहे.

....

म्युकरमायकोसिसवरील उपचारांना मिळणार बळ

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एंडोस्कोपी सायनो सर्जरीसाठी मायक्रो डिब्रायडर एंडोस्कोपी युनिटसारखे आधुनिक उपकरणे प्राप्त करून दिली आहेत. म्युकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारांना आणखी बळकटी व वेग येणार असल्याचे ‘स्वाराती’चे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी म्हटले आहे.

...

Web Title: Swarati gets Rs 88 lakh for endoscopy unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.