स्वारातीचे सिटीस्कॅन तीन दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:58+5:302021-04-06T04:32:58+5:30

: सामान्य रुग्णांना मोठा आर्थिक फटका अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन गेल्या तीन ...

Swarati's Cityscan closed for three days | स्वारातीचे सिटीस्कॅन तीन दिवसांपासून बंद

स्वारातीचे सिटीस्कॅन तीन दिवसांपासून बंद

Next

: सामान्य रुग्णांना मोठा आर्थिक फटका

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात न्यूमोनिया आणि कोविड आजारांवर उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांच्या सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद पडल्याने खासगी सिटीस्कॅनधारक प्रति रुग्ण ३ हजार ५००रुपये घेत असल्याने सामान्य रुग्णांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

कोविड दुसऱ्या लाटेमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका हॉटस्पॉट बनत चालला असून कोविड आणि न्यूमोनिया सदृश आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या येथील डीसीसीएच सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोविड, न्यूमोनियासह इतर आजारांचे योग्य निदान करण्यासाठी सिटीस्कॅनच्या निदानाचे खूप महत्त्व आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या विविध आंतररुग्ण कक्षातील अत्यावश्यक रुग्णांचे सीटी स्कॅन करावे लागते. तसेच लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या कोविड रुग्णांचे स्कॅनही स्वारातीच्याच मशीनवर करण्यात येतात. रुग्णालयात सतत वाढत जाणारा रुग्णांचा ताण या सिटीस्कॅन मशीनच्या सॉफ्टवेअरवर आल्यामुळे शनिवारी अचानक बिघाड झाला. त्यामुळे सिटीस्कॅन बंद झाले ते सोमवारपर्यंत सुरू झालेले नव्हते. रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद पडल्याने खासगी सिटीस्कॅन सेंटरवर सामान्य रुग्णांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मंगळवारी दुरुस्तीसाठी येणार अभियंता

या संदर्भात सिटीस्कॅन सेंटरवर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय स्टाफशी चर्चा केली असता, त्यांनी सिटीस्कॅन मध्ये आलेल्या बिघाडास दुजोरा दिला असून सॉफ्टवेअर दुरुस्तीसाठी मंगळवारी कंपनीचे अभियंता येणार असून दुरुस्तीनंतर सीटी स्कॅन नियमित सुरू होईल असे सांगण्यात आले.

Web Title: Swarati's Cityscan closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.