बीड झेडपीच्या भरतीसाठी यंत्रणा सज्ज, शनिवारपासून ४ केंद्रावर परीक्षा
By अनिल भंडारी | Published: October 6, 2023 06:31 PM2023-10-06T18:31:34+5:302023-10-06T18:32:46+5:30
सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या ५६८ पदांसाठी सुमारे २१ हजार १३१ इच्छुक तरुणांचे अर्ज आले आहेत
बीड : येथील जिल्हा परिषदेत ५६८ पदांची मेगाभरती करण्यात येत असून, या पदांसाठी इच्छुकांचे २१ हजार १३१ अर्ज आल्यानंतर आता बीड जिल्ह्यात ७ ऑक्टोबरपासून चार केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. या भरतीसाठी परीक्षा व इतर सर्व जबाबदारी आयबीपीएस या कंपनीकडे असून जिल्हा परिषदेमार्फत पूरक पर्यवेक्षकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या ५६८ पदांसाठी सुमारे २१ हजार १३१ इच्छुक तरुणांचे अर्ज आले होते. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या पसंतीनुसार जिल्हा व तेथील केंद्र निश्चित करण्यात आले. ७, ८, १० व ११ ऑक्टोबरदरम्यान तीन सत्रांत ही परीक्षा होणार असून, पोलिस बंदोबस्त तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणा नियुक्त केली आहे. बीड येथील नागनाथ इन्स्टिट्यूट, विवेकानंद इन्स्टिट्यूट आणि अंबाजोगाई येथील प्रोफेशनल इन्स्टिट्यूट व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात परीक्षा होणार आहेत. ७ रोजी २ संवर्ग, ८ रोजी १, १० रोजी ३ व ११ ऑक्टोबर रोजी ४ संवर्गाची परीक्षा होणार आहे. एकूण ३२ अधिकारी व चार सहायक केंद्राधिकारी नियुक्त असतील.