कुटुंबीयांचा टाहो... सेल्फीने केला घात, नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 10:39 AM2022-04-04T10:39:17+5:302022-04-04T10:55:18+5:30
ताहा सिद्दीकी पठाण (२०), सिद्दीकी इनायत पठाण (२३, दोघे रा. डाकळगाव वडी, ता. अंबड, जि. जालना) व शादाब (२२ रा.बिहार) अशी मृतांची नावे आहेत.
रामी लंगे
बीड/वडवणी : सेल्फी घेण्यासाठी धरणावर गेलेल्या नवदाम्पत्यासह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २ एप्रिल रोजी तालुक्यातील कवडगाव येथे घडली होेती. दरम्यान, अवघ्या, चार महिन्यांपूर्वी ते विवाहबद्ध झाले होते. सेल्फीच्या मोहाने त्यांचा घात झाला. त्यामुळे सुखी संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले.
ताहा सिद्दीकी पठाण (२०), सिद्दीकी इनायत पठाण (२३, दोघे रा. डाकळगाव वडी, ता. अंबड, जि. जालना) व शादाब (२२ रा.बिहार) अशी मृतांची नावे आहेत. सिद्दीकी व ताहा पठाण यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ताहाचे माहेर कवडगाव (ता. वडवणी) आहे. तिचे वडील तेथे शिक्षक आहेत. ताहा दोन दिवसांपूर्वी पती सिद्दीकी व सिद्दीकीचा मित्र शादाबसोबत कवडगाव येथे आली होती. २ एप्रिल रोजी दुपारी जेवण केल्यानंतर ते तिघेही कवडगाव-तालखेड रस्त्यावरील माजलगाव धरणाच्या पात्रात फोटो सेशनसाठी गेले होते. धरणातील एका बेटाचे ठिकाण त्यांनी सेल्फीसाठी निवडले. गुडघाभर पाण्यातून ते बेटाजवळ पोहोचले. ताहाचा भाऊ त्यांचे फोटो व व्हिडिओ घेण्यासाठी सोबत गेला होता. फोटो व सेल्फी अधिक चांगला यावा यासाठी ते तिघे अधिक खोल पाण्यात गेले व त्यानंतर ते बुडू लागले. त्यांनी आरडाओरड केल्यावर ताहाच्या भावाने इतर तरुणांना बोलावून घेतले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले; पण तिघांनाही वाचविण्यात यश आले नाही. सहायक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे, पोलीस हेडकाॅन्स्टेबल विठ्ठल गित्ते, पोलीस नाईक विलास खरात, महेश गर्जे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी मृतदेह पाण्याबाहेर काढून वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले.
रमजानवर दु:खाचे सावट
३ एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्यातील उपवास सुरू झाले. त्याच्या पूर्वसंध्येलाच नवदाम्पत्यासह अन्य एक अशा तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे कवडगाववर शोककळा पसरली. ताहा व सिद्दीकी या दाम्पत्याचा दफनविधी कवडगाव येथे करण्यात आला तर शादाबाचे नातेवाईक ३ रोजी वडवणीत पोहोचले. त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.
कुटुंबीयांचा टाहो
रमजाननिमित्ताने ताहा माहेरी काही दिवस विसाव्यासाठी पतीसोबत आली होती; मात्र सेल्फीच्या नादात तिच्यासह तिघांना जीव गमवावा लागला. त्यामुळे तिचे सुखी संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले. तिच्या आठवणी जागवत कुटुंबीयांनी आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरुन आले. यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
कवडगाव (ता.वडवणी) येथे घटनास्थळी ग्रामस्थांनी अशी गर्दी केली होती.