होमगार्डला वर्षभर कर्तव्यावर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:36 AM2020-01-28T00:36:31+5:302020-01-28T00:36:59+5:30
होमगार्ड जवानांना वर्षाचे ३६५ दिवस कर्तव्यावर सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बीड : होमगार्ड जवानांना वर्षाचे ३६५ दिवस कर्तव्यावर सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्र शासनाने होमगार्डच्या हितार्थ चांगला निर्णय घेतला होता. या निर्णयात होमगार्डला किमान १८० दिवस काम देण्याचे ठरवले होते. मात्र महासमादेशक संजय पांडे यांनी १० जानेवारी २०२० रोजी राज्यातील तब्बल १५ हजार होमगार्डला पदावरुन बाजुला सारले असून निधी उपलब्ध नसल्याने ५० टक्के होमगार्डला कायमस्वरुपी बंदोबस्तासाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे होमगार्ड यांना इतर राज्याप्रमाणे १८० दिवसावरुन ३६५ दिवस काम मिळवून द्यावे.
त्यांचे मानधन बंदोबस्त केल्याच्या १० ते १२ दिवसात जमा करावेत. होमगार्डची सेवा ५५ वरून ५८ वर्ष करावी, आदी मागण्या या मोचार्तून करण्यात आल्या.
मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले, गणेश पवार, श्रीकांत देशमुख, दीपक कापले, विशाल चांदमारे, रणवीर पवार, आशाताई पवार यांच्यासह होमगार्ड मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.