पतीच्या जागेवर मलाच घ्या... कंत्राटी शिपायाच्या पत्नीचा आरोग्य केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न
By सोमनाथ खताळ | Published: September 26, 2022 06:01 PM2022-09-26T18:01:12+5:302022-09-26T18:01:44+5:30
चऱ्हाटा आरोग्य केंद्रातील प्रकार : गोळ्या सेवन करताना डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी रोखले
बीड : पतीच्या जागेवर मला शिपाई म्हणून का घ्या, असे म्हणत एका कंत्राटी शिपायाच्या पत्नीने गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बीड तालुक्यातील चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी दुपारी घडला. सध्या या पत्नीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्येक आरोग्य केंद्रात खाजगी कंपनीद्वारे शिपाई पद भरण्यात आलेले आहे. चऱ्हाटा आरोग्य केंद्रातही अशोक उबाळे हे शिपाई म्हणून रूजू झाले होते. परंतू त्यांना काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या ठिकाणची ऑर्डर आल्याने त्यांनी आरोग्य केंद्रातील राजिनामा दिला. त्यांच्या जागेवर भारत दासर नामक व्यक्तिला नियूक्ती देण्यात आली. परंतू भारत ऐवजी मला शिपाई म्हणून घ्या अशी मागणी अशाेक यांच्या पत्नी रेखा यांची होती. परंतू ही भरती कंपनीमार्फत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कंपनीला भेटण्यास सांगितले. चार दिवसांपासून हा गोंधळ सुरू होता. अखेर सोमवारी दुपारी रेखा उबाळे यांनी आरोग्य केंद्र गाठत सोबत आणलेल्या विशिष्ट प्रकारच्या गोळ्या सेवन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ धरले आणि रूग्णवाहिकेतून बीड जिल्हा रूग्णालयात पाठविले. सध्या या महिलेवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, घटना समजताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी आरोग्य केंद्रात संपर्क साधून माहिती घेतली. पुढील कारवाई सुरू असल्याचे डॉ.कासट यांनी सांगितले.
अशोक उबाळे हे आमच्याकडे खाजगी कंपनीमार्फत शिपाई म्हणून नियूक्त होते. त्यांनी राजिनामा दिल्याने त्यांच्या जागी भारत दासर यांना कंपनीने नियूक्ती दिली. परंतू उबाळे यांच्या जागेवर मलाच घ्या, असे म्हणत त्यांच्या पत्नीने गोळ्या खाल्या. त्यांना तात्काळ रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात पाठविले. या नियूक्तीशी आमचा कसलाही संबंध नाही.
- महेंद्र बांगर, वैद्यकीय अधिकारी, चऱ्हाटा