पवारसाहेब, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, माजी राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 10:02 PM2018-09-13T22:02:28+5:302018-09-13T22:03:26+5:30
शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हटले जाते. त्यामुळे पवार यांनी तात्काळ धनंजय मुंडेंच्या हातात नारळ द्यावा
बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आणि सध्याचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हटले जाते. त्यामुळे पवार यांनी तात्काळ धनंजय मुंडेंच्या हातात नारळ द्यावा असे धस यांनी म्हटले आहे. तसेच मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकावेत, अशी मागणीही धस यांनी केली आहे.
विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या संत जगमित्रनागा सूतगिरणीसाठी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ कोटी रुपयांचे घेतलेले कर्ज हे मालमत्ता तारण न ठेवताच होते. या कर्जापोटी धनंजय मुंडे, त्यांच्या सौभाग्यवती राजश्री मुंडे व इतर आठ संचालकांची मालमत्ता गहाण ठेवत त्या मालमत्तेचे हस्तांतरण अथवा ती मालमत्ता इतरत्र गहाण ठेवू नये, असे आदेश अंबाजोगाई येथील दुसरे अप्पर सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी दिले. त्यानंतर, धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी थेट शरद पवार यांच्याकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्याचं वाईट वाटत असेल तर शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका. जिल्हा बँकेचा ठेवीदार गोरगरीब आहे. हे पैसे न मिळाल्यामुळे अनेकांचे आई-वडिल देवाघरी गेले, अनेकांचे लग्न मोडलें. त्यामुळे खोट बोल पण रेटून बोल, याच थोड भान विरोधी पक्ष नेत्यांनी ठेवलं पाहिजे, असेही धस म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या मालमत्तेला न्यायालयाने लावली टाच; सूतगिरणीसाठी घेतले होते विनातारण कर्ज
याप्रकरणी २० ऑक्टोबर २०१८ रोजी धनंजय मुंडे यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी सुडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर केल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.