गोदाकाठावरील गावांच्या सजाचा काटेरी मुकुट घेण्यास तलाठ्यांची ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:55+5:302021-07-10T04:23:55+5:30
राजेश राजगुरू तलवाडा : गेवराई तालुक्यातील गोदाकाठावरील गावांचे सजे घेण्यास कोणतेही तलाठी धजावत नसल्याने ...
राजेश राजगुरू
तलवाडा : गेवराई तालुक्यातील गोदाकाठावरील गावांचे सजे घेण्यास कोणतेही तलाठी धजावत नसल्याने या सजातील गावांची अनेक वर्षांपासून त्याच तलाठ्यावर जबाबदारी कायम ठेवल्याने तीन वर्षांनंतर बदलीचा नियम केराच्या टोपलीत टाकण्यात आलेला आहे.
तालुक्यात जवळपास ५७ सजे आहेत. यात १८३ गावे येतात. यातील जवळपास १२-१५ सजांर्तगत येणाऱ्या काही गावांना गोदाकाठची देणगी लाभलेली आहे. एकेकाळी या सजावर येण्यासाठी फिल्डिंग लावली जायची, कारण वाळूचे अर्थकारण तलाठ्यांसह सर्वांनाच मोहीत करायचे. पण गत काही वर्षांपासून या सजावर येण्यासाठी कोणताही तलाठी धजावत नसल्याचे चिञ दिसत आहे. या जवळपास १२ सजांवरील अर्ध्याहून अधिक सजांवरील तलाठ्यांना पाच-पाच वर्षांपेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे, तर उर्वरित सजावर तालुक्यात नवीन नियुक्ती होऊन आलेले तलाठी दिलेले आहेत. जुने लोक हे सजे घेण्यास नकारच देतात. नियमाने एका सजावर तीन वर्षे राहता येते. पण गोदाकाठावरील सजावर येण्यास कोणी धजावत नसल्याने आहे त्याच तलाठ्यांवर हा भार सोपवला जात आहे.
गोदाकाठावरील सजात गोपत पिंपळगाव, रामपुरी, राजापूर, भोगलगाव, राहेरी, अंतरवाली, कटचिंचोली, हिंगणगाव, आगरनांदुर, खामगाव, राक्षसभुवन, सुरळेगाव, गुळज, बोरगाव बु. या सजांचा समावेश आहे. यातील बहुतांश सजाच्या तलाठ्यांना ५-६ वर्षांपर्यंतचा कालावधी उलटलेला आहे. त्यामुळे नियमानुसार यांची बदली होणे गरजेचे आहे.
"अर्थाला" दुसरे, बळीचे बकरे मात्र सजावरील तलाठी
गेल्या अनेक वर्षांपासून या गावांतून वाळू उपसा होतो आहे. या उपशाला वरपर्यंतचे अधिकारी जबाबदार असताना कारवाई, चौकशी फक्त संबंधित तलाठी मंडल अधिकारी यांचीच होते. त्यामुळे "करून जातो सारा गाव, दफ्तराला मात्र यांचे नाव" असा प्रकार होत असल्याने या सजावर येऊन बळीचा बकरा होण्यास कोणी तयार नसते.
धाक दाखवून दिले जातात हे सजे
या सजावर येणारे तलाठी हे एक तर नवीन भरती किंवा वरिष्ठांची मर्जी राखत घाबरणारे तलाठी असतात. प्रत्येक तहसीलदारांच्या पुढे पुढे करत खरे मलिदावाले व मलिदा मिळवून देणारे, वाळूपासून दूरचा सजा घेतात. मात्र वाळूचे अर्थकारण तेच लोक चालवतात.