लाचेच्या पैश्यांतून तलाठी करणार होता दिवाळी खरेदी; त्याआधीच ‘एसीबी’ने घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 06:47 PM2024-10-30T18:47:32+5:302024-10-30T18:47:51+5:30
तलाठ्याला पकडण्यासाठी ‘एसीबी’चे पथक लपले काटेरी झुडपात; शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात
बीड : शेतकऱ्याकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना तळेगाव सज्जाच्या तलाठ्याविरोधात बीडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कारवाई केली. यावेळी पैसे घेण्यापूर्वी तलाठी आपल्या खासगी कार्यालयाच्या बाहेर आला. आपल्याला पाहू नये, यासाठी एसीबीचे पथक चक्क काटेरी झुडपात लपले. एका अधिकाऱ्याने तर मनोरुग्ण असल्याचीही नक्कल केली. शेवटी सापळा यशस्वी करूनच हे पथक परतले.
मदन लिंबाजी वनवे (वय ४७) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तो बीड तालुक्यातील तळेगाव सज्जा सांभाळतो. तो सज्जावर न थांबता बीडमधील खासगी कार्यालय थाटून काम करत होता. तक्रारदार यांना त्यांचे मित्राने मौजे तळेगाव येथील शेत गट क्रमांक १९२ मधील मालमत्ता क्रमांक ४३०९चे मुख्य पत्र करून दिले होते. सदर प्लॉटची ग्रामीण गुंठेवारी करण्यासाठी भोगवटादार प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने शेतकऱ्याने वनवे याच्याकडे धाव घेतली. त्यांची गरज पाहून वनवे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार येताच अवघ्या काही तासांत ‘एसीबी’ने सापळा लावला. तडजोडअंती दोन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पंचासमक्ष हे पैसे घेताच पथकाने त्याला पकडले. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युनूस शेख, किरण बगाटे, पोलिस अंमलदार, भरत गारदे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे आदींनी केली.
कारवाईआधी केली पडताळणी
वनवे याची परिसरात दहशत आहे. राजकीय पुढाऱ्यांचा पाठबळ असल्याचे सांगत तो शेतकऱ्यांची अडवणूक करत होता. परंतु एका शेतकऱ्याने हिंमत करून तक्रार केली. पैसे घेऊन गेल्यावर त्याने शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर बाहेर येऊन कोणी आहे का, याची पडताळणी केली आणि मगच पैसे स्वीकारले. तोपर्यंत तक्रारदारासह पंचांनी इशारा देताच वेश बदलून फिरणाऱ्या आणि लपलेल्या पथकाने वनवेला त्याच्या बीडमधील खासगी कार्यालयातच पकडले.
दक्षता सप्ताहात पहिली कारवाई
एसीबीकडून दक्षता आणि जनजागृती सप्ताह सोमवारपासून राबविला जात आहे. उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. याच सप्ताहात तक्रार आली आणि लगेच पथकाने सापळा रचून कारवाई केली.
लाचेच्या पैशांवर फटाके खरेदी
वनवे याने सुरुवातीला २५ हजार मागितले. परंतु नंतर शेतकऱ्याची अवस्था पाहून तो २ हजार रुपयांवर येऊन ठेपला. याच पैशांवर तो फटाके खरेदी करणार होता. परंतु त्याआधीच एसीबीने त्याचे फटाके फोडले. यामुळे महसूल विभागात चांगलाच आवाज झाला.