७/१२ वरील नोंदीसाठी १५ हजारांची लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:18 PM2024-02-28T18:18:13+5:302024-02-28T18:18:43+5:30
ही कारवाई बीड तालुक्यातील चौसाळा येथे बुधवारी दुपारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
बीड : वाटणीपत्रा आधारे तक्रारदार व त्यांचा भाऊ यांची ७/१२ ला मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील तलाठ्याने आपल्या मदतनीस मार्फत १७ हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार रूपये घेताना दोघांनाही पकडण्यात आले. ही कारवाई बीड तालुक्यातील चौसाळा येथे बुधवारी दुपारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
दिलीप विष्णू कन्हेरकर (वय ३४) हे तलाठी असून दिगंबर लक्ष्मण गात (वय ६७) हे त्यांचे मदतनीस आहेत. तक्रारदार तरूणाने वडिलांच्या नावे मौजे पिंपळगाव घाट येथील शेतजमीन वाटणी पत्राआधारे स्वता:सह भावाचे नावे खाते फोड आधारे १०० रूपयांच्या बाँडवर वाटनीपत्र केले होते. त्याआधारे ७/१२ ला मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी तलाठी कन्हेरकर याने १७ हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधिताने याची तक्रार बीडच्या एसीबी कार्यालयात केली. त्यानंतर बुधवारी लगेच कन्हेरकर याच्या चौसाळा येथील खासगी कार्यालयाच्या आवारात सापळा लावला. आपला मदतनीस गात याच्या मार्फत तडजोडीअंती ठरलेली १५ हजार रूपयांची लाच घेताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या दोघांविरोधातही नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, श्रीराम गिराम, भरत गारदे, संतोष राठोड, गणेश मेहेत्रे, स्नेहलकुमार कोरडे आदींनी केली.