युतीची चर्चा गेली खड्ड्यात, शेतकऱ्यांचे बोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:59 AM2019-01-10T00:59:54+5:302019-01-10T01:01:06+5:30
युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतक-यांचे बोला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मराठवाडा दुष्काळाने होरपळतोय प्रशासकीय यंत्रणेला देणेघेणे नाही, तिकडे सरकारने १० हजार कोटींच्या कर्जमाफीची घोेषणा केली, दिले काय? शेतकºयांचा सर्वत्र आक्रोश आहे. त्यांना काम, चारा, पाणी पाहिजे. युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतक-यांचे बोला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बीड येथे आले होते. यावेळी शेतक-यांना पशूखाद्य, पाण्याच्या टाक्याचे वाटप त्यांच्या हस्ते झाले.
ठाकरे म्हणाले, कोरडी भाषणे आणि घोषणा देऊन जमत नसते. चारा छावणीला की दावणीला असा घोळ सुरुच आहे. सरकारला यंत्रणा राबवता येत नाही, आमची यंत्रणा समोर असल्याचे सांगत उपस्थित श्रोत्यांकडे अंगुलीनिर्देश केला. विहिरी, जलाशये कोरडे आहेत. त्यामध्ये पाणी नाही, परंतु शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आहे. दुष्काळ सदृष्य म्हणत खेळ चालवलाय, केंद्रीय पथक आले, मिळाले काय? हे पथक लेझीम पथक होते का? गाजर दाखवता पण गाजरही देत नसल्याचा टोला त्यांनी सरकारला लगावला.
यावेळी उज्वला योजनेचे कनेक्शन किती जणांना मिळाले? पीक विम्याचे पैसे किती जणांना मिळाले? कर्जमाफी किती जणांना झाली? असे प्रश्न विचारत ठाकरे म्हणाले, कर्जमाफी नव्हे शिवसेनेला कर्जमुक्ती पाहिजे. अन्नदात्याला खोटं बोलून फसवतात? कर्जमाफी का झाली नाही? पात्र ठरुनही कर्जमाफी मिळत नाही. घोषणांचे सोंग आणि ढोंग करु नका अशी टीका करताना मी ‘मन’ की नव्हे ‘जन की बात’ करतो, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राम मंदिराबाबत सरकारच्या भूमिकेवर बोलताना ठाकरे म्हणाले, हा विषय घटनापीठाकडे टोलविला. मग निवडणूक जाहीरनाम्यात का उल्लेख केला ? मंदिर वहीं बनायेंगे, तारिख नहीं बतायेंगे असेच चालले आहे. शिवसेना मात्र पहले मंदिर फिर सरकार यावर ठाम असल्याचे ते म्हणाले.
जुमल्यावर जुमले, घोषणांचे जुमले सुरु आहेत. रामाचासुद्धा जुमला करत आहेत. घोषणांचा पाऊस करुन दुष्काळग्रस्त जनतेचे हंडे भरणार नाहीत, केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा, तुमचे दिवसच किती उरले? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
केवळ जनतेसाठी दुष्काळ नसून बीड जिल्ह्यात राजकारणासाठी शिवसेनेचा दुष्काळ आहे. शिवसेनेचा राजकीय दुष्काळ हटविण्याचे आवाहन करताना ‘दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर’ असल्याचे ठाकरे म्हणाले.
‘लोकमत’ लोकांचे मत
सरकारच्या घोषणा कशा फसव्या आहेत, हे सांगताना त्यांनी ९ जानेवारी रोजीच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित बातमीचा वारंवार उल्लेख करून अंक दाखविला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे व्यवसाय करण्यासाठी राज्यात कर्ज मागणा-यांची संख्या ३० हजारांवर आहे आणि प्रत्यक्षात मात्र ६ हजार लोकांनाच कर्ज मिळणार, अशी बातमी ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीने छापली होती.
याचा उल्लेख करून ते म्हणाले की, ‘लोकमत’ने छापले आहे. लोकांचे मत आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात ‘लोकमत’चा अंक दाखवून केला.