बीड जिल्हा पोलीस दलात बदल्यांची चर्चा जोरात, पोलीस अधीक्षक कार्यालयात वर्दळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 08:37 PM2018-04-30T20:37:05+5:302018-04-30T20:37:05+5:30
बीड जिल्हा पोलीस दलात सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा जोरात सुरू आहे.
बीड : बीड जिल्हा पोलीस दलात सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा जोरात सुरू आहे. काहींना विनंतीवरून आवडीच्या ठिकाणी बदल्या मिळणार असल्याने त्यांच्यात आनंद आहे, तर काहींना पोलीस ठाण्यातून काढून अधीक्षक कार्यालयात आणून बसविणार असल्याने त्यांच्यात गम असल्याचे दिसून येत आहे. सध्या आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी ‘फिल्डींग’ लावली जात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात वर्दळ वाढली आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाल्यानंतर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे नियोजनही केले होते. परंतु वारंवारचे बंदोबस्त, सणोत्सव आणि इतर कारणांमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्या नव्हत्या. त्यामुळे महामानवांची जयंती झाली की अधिकाऱ्यांनी सुटीवर जाणे पसंत केले. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर हे सुद्धा रजेवर गेले. परंतु जाताना त्यांनी चार सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये दरोडा प्रतिबंधकचे सपोनि श्रीकांत उबाळे यांची पिंपळनेर पोलीस ठाण्यात बदली केली. तेथील गजानन जाधव यांची दरोडा प्रतिबंधक पथकात तर अधीक्षकांचे वाचक आनंद झोडे यांची नेकनूर पोलीस ठाणे आणि तेथील गणेश मुंडे यांची वाचक शाखेत बदली करण्यात आली होती. परंतु पदभार स्वीकारण्यापूर्वीच अवघ्या चार दिवसांतच अधीक्षकांनी या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे या चारही अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. उबाळे वगळता इतर मुंडे, झोटे व जाधव हे तिन्ही अधिकारी रजेवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर व सचिन पुंडगे यांचाही जिल्ह्यातील कार्यकाळ संपला आहे. श्रीकांत उबाळे यांचा दोन महिन्यांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष शाखेतील ही ‘त्रिमूर्ती’ जात असल्याने येथे येण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावल्याचे सांगण्यात येत आहे. दरोडा प्रतिबंधकासाठी गजानन जाधव, प्रवीणकुमार बांगर यांच्या नावाची चर्चा आहे, तर एलसीबीत कोण येणार, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
अधीक्षकांच्या रूजू होण्याची प्रतीक्षा
जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे आठवडाभरापासून सुटीवर आहेत. त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया थांबलेली आहे. ते आल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते. सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या रूजू होण्याची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. जी.श्रीधर हे १० मे पर्यंत रूजू होतील, असे सूत्रांकडून समजते.