२४ फेब्रुवारीपर्यंत कोरोना लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यासाठी ‘टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:02 AM2021-02-18T05:02:31+5:302021-02-18T05:02:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोना लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोना लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबत आरोग्य, शिक्षण, पंचायत, महसूल, पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाला पत्र देऊन लसीकरणाची तारीख ठरवून दिली आहे. यासाठी विभाग प्रमुखांची नियूक्ती करून लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी बुधवारी आदेश दिले.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रत्येक तालुक्यात केंद्र तयार केले आहे. परंतु गैरसमज व भीतीपोटी अद्यापही काही लाभार्थी पुढे आलेले नाहीत. यात सर्वात जास्त भिती ही फ्रंटलाईन वर्कर्समध्ये असल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर हेल्थ केअर वर्कर्सचेही २८ दिवस उलटूनही १०० टक्के लसीकरण झालेले नाही. हाच धागा पकडून आता सर्वच विभागांना तारीख ठरवून देत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे.
लाभार्थ्यांना संपर्क
कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी आता सर्वांनाच व्यक्तिगत संपर्क करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियूक्ती केली आहे. तसेच ज्या त्या विभागातही एका अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवून प्रत्येकाला लसीकरण करण्यासाठी पाठविण्यास सांगितले आहे.
डोस उपलब्ध, मग गती का वाढत नाही?
जिल्ह्यात कोरोना लसीचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतू सुरूवातीलपासून जसा प्रतिसाद मिळाला, तो सध्या दिसत नाही. फ्रंटलाईन वर्कर्स अद्यापही अपेक्षेप्रमाणे पुढे आलेले नाहीत. तसेच डोसचा पहिला टप्पा संपून काही लाभार्थी दुसरा डोस घेत आहेत. यात हेल्थ केअर वर्कर्सच आहेत. परंतु त्यांच्याकडूनही दुसऱ्या डोसला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मिळालेल्या सुचनांच्या आधारे २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात १०० टक्के कोरोना लसीकरण पूर्ण करावयाचे आहे. त्या दृष्टीनेच हे लसीकरण २४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी यांनी सुचना केल्या आहेत. यासंदर्भात प्रत्येक विभागाची जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. ती पूर्ण केली जाईल.
- डॉ.आर.बी.पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी
----
बीड १९९०
अंबाजोगाई १३८८
आष्टी११६५
माजलगाव८४०
धारूर५८६
केज ९१५
परळी१२११
शिरूर२७०
पाटोदा८१०
वडवणी२३७
गेवराई ११४४