डोंगरपट्ट्यातील करवंदाच्या जाळ्या झाल्या सुन्या-सुन्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:32 AM2021-05-16T04:32:22+5:302021-05-16T04:32:22+5:30
जावेद शेख धानोरा : आष्टी तालुक्यातील डोंगरपट्ट्यात करवंदाचा रानमेवा यंदा चांगलाच बहरला आहे. येणारा, जाणारा एखादा वाटसरू, लहान मुले ...
जावेद शेख
धानोरा : आष्टी तालुक्यातील डोंगरपट्ट्यात करवंदाचा रानमेवा यंदा चांगलाच बहरला आहे. येणारा, जाणारा एखादा वाटसरू, लहान मुले त्याची चव चाखताना दिसत आहेत. सध्या कोरोनाचा लॉकडाऊन असल्याने करवंदाच्या जाळ्याही सुन्या-सुन्या झाल्या आहेत.
शेडाळा, सावरगाव, वेलतुरी, देऊळगाव, गहुखेल, कारखेल, गंगादेवी, जोमदरा, लमानतांडा या परिसरात करवंदाच्या जाळ्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या करवंदालाच काही ठिकाणी काळीमैना असेही म्हणतात. या करवंदांना थोडी गोड, थोडी आंबट अशी विशेष चव असते. लहान-थोर असे सर्वचजण याला मोठ्या आवडीने खातात. करवंद शरीराला पोषक असतात. यामुळे ती अनेकजण आवडीने खातात. या परिसरातून जाताना वाटसरू गाडी थांबवून या रानमेव्याचा आस्वाद घेत असतो. सध्या मात्र लाॅकडाऊनने वाहतूक रोडावल्याने करवंदाच्या जाळ्याही सुन्या-सुन्या झाल्या आहेत.
या काळ्या मैनेला शहरात चांगलाच भाव आहे. २०० रुपये किलोपर्यंत करवंदाला भाव असतो. या करवंदाविषयी शहरातील लोकांना खास आकर्षण असते. याविषयी माहिती असणारा, त्याला खाणारा काही खास ग्राहक वर्ग आहे. प्रामुख्याने डोंगर पट्ट्यातील महिला मोठ्या प्रमाणात करवंदे गोळा करतात. या महिला आष्टी, कडा, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर या शहरांत विक्रीसाठी घेऊन जात असतात. भावही चांगला मिळतो. यंदा मात्र कोरोना रोगामुळे गावाबाहेर पडता येत नसल्याने आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. शहरवासीयांना यंदा करवंदाची चव चाखता येणार नाही.
...
ऐन उन्हाळ्यात हाताला काम नसते. दरवर्षी करवंदे विकून चांगले पैसे मिळतात. कोरोना महामारीमुळे यंदा मात्र दोन पैसे मिळण्याचा तो आधार ही संपला आहे. पोट भरायचे कसे? हा प्रश्न आता समोर उभा ठाकला आहे.
- मीना राठोड, जोमदरातांडा, ता. आष्टी.
...
यंदा कोरोनाचा लॉकडाऊन आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येकजण घरीच अडकून पडला आहे. उन्हाळा आला की बाजारात करवंदे विक्रीसाठी येतात. परंतु करवंदाची चव अजूनही चाखायला मिळाली नाही.
- राजेंद्र चव्हाण, पाथर्डी.
..
फोटो ओळी-आष्टी तालुक्यातील डोंगरपट्ट्यात काळी मैना बहरली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे करवंदाच्या या जाळ्या निर्मनुष्य झाल्या आहेत.
...