नोटीस पाठवणाऱ्यांचाच कर थकीत; माजलगाव नगरपरिषदेला व्यवसाय कर थकवल्याने दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 05:29 PM2020-12-15T17:29:10+5:302020-12-15T17:40:26+5:30
नगर परिषदेचे बॅक खातेच सिल झाल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.
माजलगाव : मागील सहा वर्षापासून व्यवसाय कर न भरल्यामुळे व्यवसायकर अधिकाऱ्यांनी माजलगाव नगर परिषदेवर दंडात्मक कारवाई केली आहे. नगरपरिषदेचे बँक खाते सिल केल्याची कारवाई केली आहे. परिणामी नगर परिषदेचे बॅक खातेच सिल झाल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. नगरपरिषदेने नुकतेच नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटीस पाठवल्या आहेत. यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे, आता नोटीस पाठवणाऱ्या नगरपरिषदेनेच कर थकवला असल्याने येथील कारभार चर्चेचा विषय ठरला आहे.
माजलगाव नगरपरिषद या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. त्याचप्रमाणे आता व्यवसाय कर भरण्यात यावा, याकरिता व्यवसायकर विभागाने वारवार नोटीसा बजावून देखील नगर परिषद प्रशासनाने नोटीसांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे 2014 पासून आजतागायत नगर परिषदेकडे 14 लाख रूपयांचा व्यवसाय कर थकवला आहे. त्यावर व्यवसायकर अधिकार्यांनी 10 लाख रूपयांचा दंड देखिल आकारला आहे. आता नगर परिषदेला व्यवसाय करापोटी 24 लाख रूपये भरायचे होते, परंतू त्यांनी यावर ही कराचा भरणा न केल्याने नगरपरिषदेचे बॅकेतील एक खाते दोन दिवसापुर्वी सिल करण्याची कारवाई व्यवसायकर अधिकार्यांनी केली आहे. परिणामी नगर परिषदेचे व्यवहार ठप्प झाले असून कामाचा खोळंबा झाला आहे.
दाद मागितली आहे
व्यवसायकर विभागाने आम्हाला दंडासह 24 लाख रूपये भरण्यास सांगीतले आहे. या विरोधात आम्ही व्यवसायकर आयुक्त यांच्याकडे दाद मागीतली आहे. - विशाल भोसले, प्र.मुख्याधिकारी न.प.माजलगाव