शिक्षकच कोविड काळातील सर्वोत्कृष्ट समुपदेशक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:49+5:302021-05-11T04:35:49+5:30
अंबाजोगाई : शिक्षकच कोविड काळातील सर्वोत्कृष्ट समुपदेशक बनून रुग्ण सेवक बनतील, असे प्रतिपादन डॉ. संजीव सावजी यांनी केले. भारतीय ...
अंबाजोगाई :
शिक्षकच कोविड काळातील सर्वोत्कृष्ट समुपदेशक बनून रुग्ण सेवक बनतील, असे प्रतिपादन डॉ. संजीव सावजी यांनी केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्र्वर शैक्षणिक संकुलात कोविड काळात मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशकांची प्रशिक्षण कार्यशाळा ऑनलाईन झाली. यासाठी औरंगाबाद येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संजीव सावजी व डॉ. मंगेश कदम हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मंगेश कदम यांनी अत्यंत शास्त्रीय, पण सोप्या भाषेत समुपदेशकांची भूमिका स्पष्ट केली. फोनवरून रुग्णांशी संवाद साधताना करावयाच्या गोष्टी, सकारात्मक विचारांची चर्चा, तसेच आहार, विहार व या काळातील वेळापत्रक कसे असावे याबद्दल पॉवर पाॅईंटच्या माध्यमातून प्रशिक्षित केले. याप्रसंगी समुपदेशनाची भूमिका स्पष्ट करताना डॉ. संजीव सावजी म्हणाले की, सकारात्मक विचारातून औषधोपचार, समुपदेशनाची शास्त्रीय पद्धत, समुपदेशनाचे मार्ग, वर्तन संकेत, भावना व विचार या दृष्टीने रुग्णांशी संवाद साधताना विश्वास, आपुलकी, प्रेम या उपचारांद्वारे रुग्ण कोरोनातून बाहेर पडेल. चांगल्या व सकारात्मक विचारांचे बीजारोपण एक नवीन ऊर्जा देत असते. समुपदेशकांनी मनाचा अभ्यास करून रुग्णांना खंबीर बनवावे व विवेकीपणा निर्माण करावा त्यातूनच रुग्णाचा दृष्टिकोन बदलतो हे चित्रफीत दाखवून स्पष्ट केले. बिपीन क्षीरसागर यांनी खोलेश्वर शैक्षणिक संकुलांनी लॉकडाऊन काळात गतवर्षीपासून केलेल्या कार्याचा परिचय करून दिला.
प्रशिक्षणाचा अध्यक्षीय समारोप करताना ॲड. किशोरजी गिरवलकर म्हणाले की, समुपदेशनामुळे समस्या नाहीशी होते. या प्रशिक्षणातून प्राध्यापक, शिक्षक यांनी रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी रुग्ण संवाद करून धीर द्यावा व आपल्या उत्स्फूर्त, निर्मळ भूमिकेतून रुग्णाचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रजी आलुरकर, सहकार्यवाहिका डॉ. कल्पना चौसाळकर, शालेय समिती अध्यक्षा शरयू हेबाळकर, डॉ. अतुल देशपांडे, रामभाऊ कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रकाशराव जोशी यांनी केले. तंत्रज्ञान भार विवेक जोशी यांनी पाहिला. या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी एकूण ९५ प्राध्यापक, शिक्षक प्रशिक्षण घेऊन समुपदेशक म्हणून कार्य करणार आहेत.