हृदय सांभाळा! पेट्रोलपंपावर शिक्षक दुचाकीवरून कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By सोमनाथ खताळ | Published: July 29, 2024 05:08 PM2024-07-29T17:08:27+5:302024-07-29T17:10:15+5:30

मला काय होतंय, मी तर धडधाकट म्हणणाऱ्यांनो हृदय सांभाळा

Teacher falls from bike while filling petrol in Beed, dies on the spot due to heart attack | हृदय सांभाळा! पेट्रोलपंपावर शिक्षक दुचाकीवरून कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हृदय सांभाळा! पेट्रोलपंपावर शिक्षक दुचाकीवरून कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बीड: सध्या प्रत्येकजण व्यवसाय, उद्योग, नोकरी, काम आदींच्या मागे धावपळ करत आहे. यामुळे प्रचंड मानसिक ताण वाढत आहे. याच धावपळीत वेळेवर जेवण न करणे, जेवणातील आहार पौष्टिक नसणे, व्यायामाचा अभाव किंवा अति व्यायाम, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. चालता बोलताही लोकांना झटका येऊन ते कोसळत असून क्षणात जग सोडून जात आहे. अशी अनेक उदाहरणे, घटना समोर येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे तरुण वयातील मुला-मुलींनाही झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मला काय होतंय, मी तर धडधाकट आहे. मी तंदुरुस्त आहे असे म्हणणाऱ्यांनीही अहंकार न बाळगता हृदय सांभाळण्याची गरज आहे. प्रत्येकानेच वर्षातून किमान दोन वेळा हृदयाची तपासणी करणे गरजेचे आहे. अशाने आपल्या शरीरातील आजारांचे निदान होऊन त्यावर वेळीच उपचार करता येऊ शकतात. त्यामुळे पोटासाठी धावत असलोत तरीही प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

बीडमध्ये काय घडले 
शहरातील नगर रोडवर पोलिस पेट्रोल पंप आहे. येथे सकाळी मिसाळ नामक शिक्षक आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्कूटीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. पुढे एक गाडी उभी होती. याचवेळी बसल्या गाडीवरच त्यांनी छातीला हात लावला आणि क्षणात खाली कोसळले. त्यानंतर पंपावरील कर्मचाऱ्यांसह परिसरातील वाहनधारक, लोकांनी धाव घेतली. कोणी त्यांना पायातील चप्पलचा वास देण्याचा प्रयत्न केला तर कोणी छाती दाबली. परंतु खाली पडल्यावर काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली होती. तेथील लोकांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु त्या आगोदरच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले. हा सर्व प्रकार पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

राज्यातील या घटनाही ताज्याच
मागील आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये कवलजितसिंग बग्गा यांचा व्यायाम करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एका पोलिस निरीक्षकाचा झोपेतच मृत्यू झाला होता. कोल्हापूरमध्ये उद्योजक शिरीष ऊर्फ प्रमाेद विनायक सप्रे यांचा मॉर्निंग वॉक करताना मृत्यू झाला होता. मुंबई दादर येथे निवडणुकीच्या बंदोबस्तादरम्यान विलास यादव या ३८ वर्षीय पोलिसाचा मृत्यू झाला होता, ही घटना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. या सर्वांचा हृदयविकाराच्या झटक्यानेच मृत्यू झाला होता. यावरून चालता-बोलताही असा झटका येऊन माणसे जगाचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

काय आहेत लक्षणे?
पायाला सूज येणे, छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मान आणि पाठ दुखणे, झोप न येणे, थकवा जाणवणे, अपचन, चक्कर येणे, घाबरल्यासारखे होणे आदी लक्षणे आढळून येतात.

या कारणांमुळे होतो...
व्यसनाधीनता, लठ्ठपणा, मधुमेह, जास्त प्रमाणात तेलकट खाणे, तुपकट खाणे, अतिरिक्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, यकृताचे आजार, जंक फूड, आधुनिक जीवनशैलीचा वापरामुळे हा विकार होतो.

तरुणांनाही धोका वाढला
आतापर्यंत हृदयविकाराचा झटका हा ४५ वर्षांवरील पुरुष आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना येऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगत होते. परंतु आता अगदी १८ वर्षांच्या तरुणांनाही अशाप्रकारे झटका येऊन मृत्यू हात आहे. धूम्रपान आणि मद्यपानही याला कारणीभूत आहे.

काय काळजी घ्यावी?
व्यायामासोबतच आहार पौष्टिक घ्यावा. छातीत दुखणे, धाप लागणे यासारखी लक्षणे जाणवत असतील तर तातडीने तपासणी करून घ्याव्यात. धूम्रपान, मद्यपान टाळावे.

प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष नको 
बदललेली जीवनशैली, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, अतितणाव, मधुमेह हीच हृदयविकाराची मुख्य कारणे आहेत. हा झटका अचानक येत नसतो. त्याला अगोदर काही पार्श्वभूमी असते. त्यामुळे छातीत दुखणे, दम लागणे अशाप्रकारच्या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्याव्यात.
- डॉ. अनंत मुळे, हृदयरोगतज्ज्ञ, बीड

Web Title: Teacher falls from bike while filling petrol in Beed, dies on the spot due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.