सुनावणीसाठी बीड जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:33 AM2018-07-20T00:33:56+5:302018-07-20T00:34:32+5:30
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी प्रशासनाकडे दाखल तक्रारीनुसार ४१५ शिक्षकांच्या सुनावणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप आले होेते.
बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी प्रशासनाकडे दाखल तक्रारीनुसार ४१५ शिक्षकांच्या सुनावणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप आले होेते. तर ज्यांनी चुकीची माहिती दिली होती, असे बहुतांश शिक्षक या सुनावणीला गैरहजर असल्याचे दिसून आले.
बीड जिल्हा परिषदेतील ३४७१ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या होत्या. या बदल्यांसाठी आॅनलाईन अर्ज भरताना चुकीची तसेच खोटी माहिती देत अनेक शिक्षकांनी बदलीचा फायदा घेतला. तर अनेक शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत संवर्ग १ व २ मधील शिक्षकांनी खो दिलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. त्यामुळे पसंतीक्रम बाद झाल्याची तक्रार आली होती. बदली प्रक्रिया सेवा ज्येष्ठतेनुसार होणे अपेक्षित असताना सेवेने कनिष्ठ शिक्षकांना वरिष्ठ शिक्षकांनी मागितलेल्या जागा देण्यात आल्या. पती- पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेण्यासाठी संवर्ग ४ मधून बदली अर्ज भरलेल्या पती- पत्नीचा या बदली प्रक्रियेत विचार झाला नाही. त्यामुळे अनेक पती- पत्नी एकटेच विस्थापित झाले. विशेष म्हणजे यात महिला शिक्षिका जास्त प्रमाणात विस्थापित झाल्या.
संवर्ग ४ मधील व संवर्ग २ मधील कर्मचाऱ्यांना वेगवेगळा न्याय बदली प्रक्रियेत मिळाल्याच्या तक्रारी होत्या. सुरुवातील सामान्य वाटणारे हे प्रकरण नंतर मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतले. या तक्रारी निकाली काढण्याच्या अनुषंगाने ४१५ शिक्षकांची सुनावणी सुरु करण्यात आली.
सुनावणीसाठी दोघांना संधी
आलेल्या तक्रारींचा निपटारा व्हावा, त्या निकाली निघाव्यात म्हणून ही सुनावणी होत आहे. सुनावणीसाठी दोघांना संधी दिलेली आहे. कागदपत्रांची तपासणी होणार आहे. तसेच १८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या आहेत. त्यांचे खुलासे आल्यानंतर कारवाई होईल.
- अमोल येडगे
मुख्य कार्यकारी अधिकारी