शिक्षकांच्या धान्य बँकेमुळे गरजुंची क्षुधाशांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:38 AM2021-03-01T04:38:15+5:302021-03-01T04:38:15+5:30
सखाराम शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : ‘जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोचि साधू ...
सखाराम शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : ‘जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ।।’ या उक्तीप्रमाणे सेवा वृत्तीचा वसा चालवणाऱ्या येथील शिक्षकांनी एकत्र येत संघर्ष धान्य बँकेची तीन वर्षांपूर्वी स्थापन केली. या बँकेच्या माध्यमातून अविरतपणे अनाथ, वंचित, शोषित, पीडित घटकातील लोकांच्या क्षुधाशांतीचे काम सुरू आहे. संघर्ष धान्य बँकेचा हा प्रवास संचितांकडून वंचितांकडे जाणारा ठरला आहे. संकट, संघर्ष, अडचणीच्या काळात ‘पोटापुरते देई विठ्ठला, लई नाही मागणं’ अशी भावना असते. ती गरज या बँकेने भागविण्याचा प्रयत्न केला आहे.
या धान्य बँकेचे संचालक प्रत्येक महिन्याला दानशूर व्यक्तिंकडून धान्य गोळा करतात. हे जमा झालेले दोन अथवा तीन क्विंटल धान्य बीड जिल्ह्यातील अनाथाश्रमाला पोहोच करतात. जिल्ह्यात जवळपास सहा अनाथाश्रमांना ही धान्य बँक सातत्याने मदत करत आली आहे. समाजातील गरीब, वंचित, शोषित, पीडित कुटुंबांसाठीही ही धान्य बँक आधार ठरली आहे. लॉकडाऊनच्या काळात मजुरी करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी संघर्ष धान्य बँक गरजूंच्या मदतीला धावून गेली. अनेक कुटुंबाच्या घरी जाऊन संघर्षने धान्य व किराणा पोहोच केला.
सोशल मीडियाचा वापर करून संघर्ष धान्य बँकेने तीनशे शिक्षक व समाजसेवी मंडळींचा ग्रुप तयार करून त्याद्वारे दानशूर व्यक्तिंना आवाहन केले. समाजातील अनेक दानशुरांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता दरमहा दोन ते तीन क्विंटल धान्य जमा होत आहे. दरमहा एक किलो धान्य आमच्याकडे जमा करा, आम्ही ते अनाथालयाला पोहोच करू, असे वचन बँकेने दिले आहे.
संघर्ष धान्य बँकेने आतापर्यंत मातोरी, नामलगाव फाटा, इन्फंट इंडिया पाली, तांब्याचे राक्षस भुवन, सहारा अनाथाश्रम, गेवराई इत्यादी ठिकाणी धान्य व किराणाची मदत पोहोच केलेली आहे. साक्षाळपिंपरी येथील दृष्टीहीन सहा कुटुंब, गेवराई, उमापूर, मादळमोही, बंगाली पिंपळा येथील गरीब कुटुंबांनाही धान्यरूपी मदत पोहोच केलेली आहे.
आतापर्यंत संघर्ष धान्य बँकेने दानशूर व्यक्तिंकडून १०० क्विंटल धान्य जमा करून अनेक अनाथाश्रमांना व गरीब कुटुंबांना पोहोच केले आहे. संचालक शिवाजी झेंडेकर, संजय पांढरे, सुभाष काळे, धर्मराज करपे, सुरेश भोपळे, बाळासाहेब गावडे, सुरेश नवले आदींची संघर्ष धान्य बँकेची टीम गरजूंच्या सेवेत कार्यरत आहे.
===Photopath===
280221\28bed_12_28022021_14.jpg