जीपीएफच्या पावतीसाठी शिक्षकांचे हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:28 AM2021-01-15T04:28:23+5:302021-01-15T04:28:23+5:30
अंबाजोगाई : जीपीएफ च्या पावत्यासाठी शिक्षकांना बीड येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. पैसे भरूनही पावती दिली जात नसल्याने शिक्षकांमध्ये ...
अंबाजोगाई : जीपीएफ च्या पावत्यासाठी शिक्षकांना बीड येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. पैसे भरूनही पावती दिली जात नसल्याने शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जीपीएफच्या पावत्या देण्यासाठी कार्यालयाकडून नेहमीच टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शिक्षकांकडून केला जात आहे.
शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेली रक्कम जमा होत असते. भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेली रक्कम कर्मचारी अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी वापरू शकतात. त्याचप्रमाणे या निधीचा फायदा निवृत्तीच्या वेळी होत असतो. सर्व कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी हा अत्यंत महत्वाचा समजला जातो. त्याकरिता शिक्षक, प्राध्यापक बांधव जास्तीत जास्त रक्कम बचत म्हणून भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतःच्या जीपीएफ खात्यावर किती रुपये जमा झाले आहेत. याची पावती जीपीएफ बीड कार्यालयाकडून दिली जात नाही मुद्दामहून पावती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शिक्षक बांधवांनी केला आहे. त्याचप्रमाणे अर्ज करून अत्यावश्यक कारणासाठी मागणी केलेली रक्कम प्राप्त करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात कांही ना कांही टेबलावर वजन ठेवावे लागते . त्याशिवाय मागणी केलेली रक्कम मंजूर केली जात नाही, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा असलेली रक्कम कर्मचाऱ्यांना सहजासहजी व कमीत कमी कागदपत्रे दाखल करून मिळत नाही. मुद्रांक,विवाह पत्रिका,खरेदीखत अशा जाचक अटी लादल्या जातात. जमा रक्कम कर्मचाऱ्यांचीच असल्याने कुठल्याही प्रकारच्या अटी व शर्ती न लादता केवळ कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून रक्कम दिली गेली पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
कोट
कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधी बाबतच्या पावत्या दर महिन्याला दिल्या गेल्या पाहिजेत. कर्मचाऱ्याने पावती मागितल्यास देणे बंधनकारक आहे. रक्कम मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जात असल्यास संबंधित अधीक्षकांनी चौकशी करून कार्यालयीन दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
- मधू शिनगारे
( सेवानिवृत्त शिक्षक, अंबाजोगाई )