शाळा वाऱ्यावर सोडून शिक्षक गेले वारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 02:55 PM2019-07-13T14:55:11+5:302019-07-13T14:59:27+5:30
शिक्षक शाळा वाऱ्यावर सोडून वारी यात्रेला गेल्याचा प्रकार पालकांनी उघडकीस आणला
बीड : आषाढी एकादशीची सुटी नसताना शिरुर कासार येथील जि.प.शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळा वाऱ्यावर सोडून वारी यात्रेला गेल्याचा प्रकार पालकांनी उघडकीस आणल्यानंतर जि. प. सीईओ यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर काही वेळेतच गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. तर आष्टी तालुक्यातील गहूखेल येथील शाळा चक्क बंदच होती, याप्रकरणी ग्रामस्थांनी तक्रार केली.
आषाढी एकादशी निमित्त पालक बाळू बोराडे,सतिष मुरकुटे,बंडू सोनवणे,राजेश काटे यांनी सकाळी ११ वाजता शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक भागिनाथ बांगर हे पंढरपूरच्या वारीला गेल्याचे समजले. शिवाय इतर चार शिक्षकांनी त्यांच्या किरकोळ रजा टाकल्या होत्या. एकूण १९ पैकी १२ शिक्षकच प्रत्यक्षात हजर होते.चार शिक्षकांच्या रजा होत्या. तर दोन शिक्षक प्रतिनियुक्तीवर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आहेत. यासंदर्भात पालकांनी सीईओ अमोल येडगे यांना सांगितल्या नंतर त्यांनी तत्काळ गटविकास अधिकारी आर.के. बागडे व गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांना शाळेवर जावून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.
नोटीस देणार
मुख्याध्यापक भागीनाथ बांगर यांचा कसल्याही रजेचा अर्ज नसून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याची परस्पर रजा मान्य करू नये. पूर्वपरवानगीशिवाय जाऊ नये तसेच ज्यांना रजेवर जायचे आहे अशा शिक्षकांनी स्वत: अर्ज दाखल करावेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविणार असल्याचे गटविकास अधिकारी आर. के. बागडे यांनी सांगितले.