सहशिक्षकाच्या त्रासाने शिक्षिकेला अश्रू अनावर;सावरगाव जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 04:20 PM2020-01-01T16:20:50+5:302020-01-01T16:25:02+5:30
. या त्रासाला कंटाळून अखेर शिक्षिकेने माध्यमांसमोर याची वाचा फोडली यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हापरिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतील एका वयस्कर शिक्षिकेला ज्या की,विशाखा समितीच्या अध्यक्षा आहेत त्यांनाच सहकारी शिक्षक संदीप सोले अंगविक्षेपावर थट्टा उडवणे, विद्यार्थ्यांसमोर वयावरून खिल्ली उडवणे आदी अनेक प्रकारे छळवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या त्रासाला कंटाळून अखेर शिक्षिकेने माध्यमांसमोर याची वाचा फोडली यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. या सर्व प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून त्या शिक्षकावर कार्यवाहीची मागणी होत आहे.
जिल्हापरिषदेच्या शिक्षकांमधील कुरबू-या तशा नवीन नाहीत मात्र सावरगाव येथील जी.प. शाळेतील संदीप सोले नावाचा शिक्षक येथील इतर शिक्षकांना त्रास देण्यात तसा पारंगतच म्हणावे लागेल. त्याला कारणही तसेच आहे सदर शिक्षक हा येथील महिला शिक्षकांना त्यांच्या नावाने अथवा महिलांप्रति कुठलाही आदर न ठेवता थेट अंगविक्षेपावरून हाका मारतो तसेच त्या शिक्षिकेकडे काही काम असल्यास किंवा त्यांना बोलवायचे असल्यास वयावरून "त्या म्हातारीला बोलवा " असे म्हणून हीन वागणूक देतो. यासोबतच मुख्याध्यापक बी.एस. शेंदरे हे गैरहजर असताना त्या शिक्षिकेकडे चार्ज दिल्यास शाळेची घंटी लपवून ठेवणे , वर्गावर मुद्दामहून न जाणे, त्रास होईल असे प्रकार करणे यामुळे सदर शिक्षिका ही वैतागून गेली आहे.
मुळात या शिक्षिका ह्या वयस्कर असून नियत वयोमानानुसार अवघे दोन वर्षे सेवा निवृत्तीसाठी राहिल्यामुळे पुढे त्रास होऊ नये म्हणून संदीप सोले या शिक्षकाचा त्रास त्या सहन करीत राहिल्या. या बाबत मुख्याध्यापक बी.एस. शेंदरे , गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांच्याकडे तोंडी तक्रार करूनही या जबाबदार लोकांनी या शिक्षकाला पाठीशी घातले त्यामुळे शेवटी वैतागून त्यांनी माध्यमांना याबाबत कळविल्यानंतर ही बाब उघड झाली. सदर शिक्षकाच्या त्रासाबाबत सांगताना अक्षरशः या वयस्क शिक्षिकेला अश्रू अनावर झाले.
दरम्यान सदर शिक्षक हा शाळेत केवळ तनाने हजर असतो मात्र मनाने तो मोबाईलमध्ये खेळत असलेला तसेच इतर शिक्षकांना त्रास देण्याच्याच प्रतापात असतो या शिक्षकामुळे येथील अनेक शिक्षक हे त्रस्त आहेत तसेच विद्यार्थ्यांना देखील याचा त्रास असून अनेक विद्यार्थ्यांना मारहाण देखील या शिक्षकाने केलेली असल्याने या शिक्षकावर थेट निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी होताना दिसत आहे.
सावरगाव येथील शाळेवर झालेल्या प्रकाराची मला माहिती नाही या बाबत माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
- रवींद्र महामुनी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी
या बाबत सदरील शिक्षकाला मी दोन तीन वेळेस समज दिली आहे परंतु तो शिक्षक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही व सदर शिक्षिकेला वारंवार त्रास देत आहे या बाबत वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे.
- बी.एस. शेंद्रे, मुख्याध्यापक