तहसीलदार, तलाठ्यासोबत धुडगूस; वाळूमाफियाने हायवा पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:15+5:302021-07-09T04:22:15+5:30
तालुक्यात अवैध वाहतूक करणारी जड वाहने यांच्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच तालुक्यातील गोदाकाठच्या नदीपात्रात संचारबंदी लागू करण्यात ...
तालुक्यात अवैध वाहतूक करणारी जड वाहने यांच्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच तालुक्यातील गोदाकाठच्या नदीपात्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच अनुषंगाने गेवराई महसूलने वाळूमाफियाविरोधात आपली कंबर कसली. वाळूचा हायवा हा राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांना मिळाली. त्यानंतर लगेच तलाठी परम काळे यांना घेऊन ते गढीच्या दिशेने रवाना झाले.
सदरील वाळूची गाडी भरधाव वेगात हायवेवरून निघाली. गढीपासून रांजणीपर्यंत तहसीलदार यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला व सदरची हायवा गाडी रांजणीच्या पुढे पकडली. परंतु, चालकाला विचारले असता तो विनारॉयल्टी चालला असल्याचे निदर्शनास आले. त्याने मालकाला फोन केला व त्या ठिकाणी एक स्कॉर्पिओतून काहीजण आले. तहसीलदार सचिन खाडे व तलाठी परम काळे यांच्यासोबत हुज्जत घालू लागले.
तहसीलदार यांनी हायवा ताब्यात घेतला. मात्र याच दरम्यान तहसीलदार सचिन खाडे व तलाठी परम काळे यांच्याशी काहीजणांनी धुडगूस घातला. तहसीलदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन हायवामध्ये एक पोलीस व एक महसूल कर्मचारी बसवून तो हायवा तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र वाळूमाफियांनी हा हायवा दोन्ही कर्मचाऱ्यांना धमकावून सिनेस्टाईल पळविला. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक राहुल खंडागळेसह तिघाजणांवर बुधवारी (दि. ७) रात्री तलाठी परम काळे यांच्या फिर्यादीवरून उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी मात्र फरार आहेत.