तहसीलदारांनी पकडलेले वाळूचे दोन हायवा लगेच सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:11+5:302021-04-13T04:32:11+5:30
माजलगाव : वाळूने भरून जाणारे दोन हायवा तहसील पासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या नाईक कॉम्प्लेक्स समोर तहसीलदारांनी ...
माजलगाव : वाळूने भरून जाणारे दोन हायवा तहसील पासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या नाईक कॉम्प्लेक्स समोर तहसीलदारांनी पकडल्या. ही कार्यवाही सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास करण्यात आली. परंतु ही वाहने तहसील कार्यालय अथवा पोलीस ठाण्यात जमा न करता सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या प्रकरणात मोठी तडजोड झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
तालुक्यात दोन वाळू लिलाव झाले असले तरी इतर वाळू घाटांवरून लिलावाव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक केली जात आहे. यामुळे लिलावाद्वारे करोडो रुपये गुंतवणूक करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे अशा वाहनांची तपासणी महसूलसह पोलिस अधिकाऱ्यांनी करणे क्रमप्राप्त आहे. परंतु या बाबतीत प्रशासनाकडून पाऊले उचलण्यात येत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील गंगामसला,रिधोरी,शिवणगाव, पुरुषोत्तमपुरी,महातपुरी,मोगरा,
डाकेपिंपरी,सांडसचिंचोली इत्यादी ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे.
तहसीलदार वैशाली पाटील यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील बायपासरोडवरील नाईक कॉम्प्लेक्ससमोर साडेचार वाजेच्या दरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा गाड्या पकडल्या. यावेळी याच ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणे सुरू होते. त्यामुळे कंपनीच्या दोन मुरुमाच्या हायवा गाड्या मुरूम टाकत होत्या. त्या गाड्यांची तहसीलदारांनी चौकशी केली. परंतु वाळू घेऊन जाणाऱ्या दोन हायवा बाजूला लावले होते. यावेळी तहसीलदारांनी ही वाहने तहसीलला न घेता सोडून दिल्या. यावेळी गाडी सोडण्यासंदर्भात गुप्तगू होऊन मोठी आर्थिक तडजोड झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यामुळे तहसीलदारांनी वाळूच्या गाड्या पकडून लागलीच तडजोड करून सोडून दिल्याची परिसरात चर्चा ऐकायला मिळत आहे.
एखादवेळी होणार अडचण
येथील तहसीलदारांनी चार दिवसांपूर्वीच सावरगावजवळ एक हायवा तडजोडीनंतर सोडून दिला होता. त्याचप्रमाणे सोमवारीदेखील वाहने सोडुन दिल्याची चर्चा होती. तहसीलदारना माहिती असतानाही वाळुच्या गाडया सोडण्याचे प्रकार होत आहेत. एखादेवेळी तहसीलदार अथवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सोडलेली वाहने पुढे दुसऱ्या पथकाकडून अथवा पोलिसांकडून पकडल्यास महसूल कर्मचाऱ्यांच्या खाऊगिरीमुळे तहसीलदारांची मोठी अडचण होऊ शकते.
लिलाव पावत्या तपासणीसाठी वाहने पकडली
तालुक्यात दोन ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत. त्याचप्रमाणे इतर घाटावरूनही मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची ओरड आहे. ही वाहने तपासणीसाठी पकडण्यात आली होती. यावेळी वाळू वाहतूक करणाऱ्या चालकाकडे पावत्यांची मागणी करण्यात आली. संबंधित चालकांनी लिलाव पावत्या दाखवत आमचे समाधान केले. त्यामुळे पकडलेल्या दोन्ही हायवा आम्ही सोडून दिले- वैशाली पाटील, तहसीलदार माजलगाव.