तहसीलदारांनी बीडीओला बजावल्या तीन नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:09+5:302021-05-05T04:55:09+5:30
माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात मागील अनेक दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने ज्या गावात ...
माजलगाव
: तालुक्यातील ग्रामीण भागात मागील अनेक दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने ज्या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण असल्यास कंटेन्मेंट झोन करणे आवश्यक असतांना अपुरी माहिती व कंटेन्मेंट झोन करण्यास असमर्थ ठरलेल्या पंचायत समित्यांच्या बीडीओंना येथील तहसीलदारांनी तीन नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा संयुक्तपणे कोरोनाशी लढा देत असताना तालुक्यात मात्र जबाबदारीवर बोट ठेवले जात असल्याने रुग्ण कोरोनामुक्त झाले तरी कंटेन्मेंट झोनची कार्यवाही रखडली आहे.
माजलगाव तालुक्यातील ४० ते ५० गावांमध्ये कोरोनाचे पाचपेक्षा जास्त रुग्ण आहेत. सध्या वांगी, लवूळ, नित्रूड, बडेवाडी, चोपनवाडी, सादोळा, भाटवडगाव, चिंचगव्हान, उमरी, आबेगाव, तालखेड, लोनगावसह अनेक गावात पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. आयएमसीआर व शासनाच्या निर्देशानुसार पाचपेक्षा जास्त गावात कोरोना रुग्ण आढळले असतील तर त्या गावातील ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे कोणाच्या घरापासून कोणाच्या घरापर्यंत कंटेन्मेंट झोन करायचा आहे, याचा प्रस्ताव द्यायचा आहे. त्यानंतर पंचायत समिती हा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवून व त्यास मंजुरी मिळाल्यानंतर त्या गावात १४ दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन करायचा आहे. माजलगाव तालुक्यातील गावात कंटेन्मेंट झोनचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसील कार्यालयाकडे पाठविल्यानंतर या सर्व प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी व चुकीचे अनेक प्रस्ताव दिल्याने तहसीलदारांनी हे सर्व प्रस्ताव रद्द केले. त्यानंतरही वेळेवर माहिती न दिल्याने व वारंवार सांगूनही बीडीओ प्रज्ञा माने भोसले यांनी वेळेत प्रस्ताव पाठवले नसल्याने तहसीलदारांनी तीन नोटीस बजावल्या. तरीदेखील कामकाजात सुधारणा झाली नसल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अद्याप कंटेन्मेंट झोनच होऊ शकले नसल्याचे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. उपाययोजना वेळेवर होत नसल्याने ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्ण वाढ होत आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी कंटेन्मेंट झोन केल्याची तत्काळ माहिती तहसील कार्यालयास देणे आवश्यक असताना त्यांच्याकडून काही मोजक्या गावांची माहिती मिळाली. मात्र, उर्वरित गावांची माहिती मिळालेली नाही. यामुळे बीडीओचे ग्रामीण भागावर फार असे काही नियंत्रण दिसून येत नसल्याने त्यांना आम्ही तीन नोटीस बजावल्या आहेत.
--- वैशाली पाटील, तहसीलदार
कंटेन्मेंट झोन करण्याची जबाबदारी आमची नसून, ही जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची आहे. सहकार्याची भावना म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत.
----प्रज्ञा माने भोसले, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव.