सांगा, जगायचं कसं? भटक्या समाजाचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 05:50 AM2018-07-13T05:50:50+5:302018-07-13T05:51:14+5:30
टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतो. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे कुटुंब चालते, परंतु मागच्या काही दिवसांपासून वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे.
बीड : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतो. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे कुटुंब चालते, परंतु मागच्या काही दिवसांपासून वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे. त्यामुळे आता झोपडीबाहेर पडायचीसुद्धा भीती वाटत आहे. झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, असा जगण्यातील रोजचा संघर्ष डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी ‘लोकमत’जवळ मांडला.
मागील काही महिन्यांपासून मुले पळविणारी टोळी समजून भिक्षुकी, भिकारी, भंगारवाले, गोसावी आदी भटक्या समाजातील नागरिकांसह परराज्यातून आलेल्या लोकांना मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांना जमावाने ठेचून मारल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे भटक्या समाजातील लोक अक्षरश: जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
याच प्रश्नावर बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर अ.भा. बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली विविध संघटना, समाजातील नागरिकांनी गुरुवारी मोर्चा काढला. मोर्चा संपल्यानंतर जमलेल्या विविध समाजातील नागरिकांसोबत ‘लोकमत’ने संवाद साधला.
घटनेनंतर दोन दिवस आमच्या घरातील एकही जण बाहेर पडला नाही. त्यामुळे उपाशीपोटी झोपावे लागले, असे त्यांनी सांगितले़