१२२ वर्षांची परंपरा, निजाम काळापासून टेंबे गणपतीचे भाद्रपद एकादशीला होते आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 05:51 PM2022-09-05T17:51:09+5:302022-09-05T17:51:58+5:30
यावर्षी दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी वहीपेन श्रीचरणी अर्पण करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे
माजलगाव (बीड) : माजलगावचा राजा म्हणून ओळख असलेल्या श्री. ढुंढीराज टेंबे गणपतीची मंगळवारी भाद्रपद एकादशीला विधीवत स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या दुपारी ३ वाजता गावातून मिरवणूक निघून सायंकाळी ७ वाजता विधीवत पुजा करून टेंबे गणपतीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनंतदेवा जोशी यांनी दिली आहे.
निजामकालिन राजवटीत सन १९०१ साली माजलगावात टेंबे गणपतीची स्थापना करण्यात आली. आजतागायत मंडळाने सर्व परंपरा जोपासल्या आहेत. शहरातील सर्वांत जुन्या गणपती मंडळाला ऐतिहासिक वारसा आहे. १२२ वर्षांची परंपरा असलेले टेंबे गणेश मंडळ गणेशोत्सवात विविध समाजापेयागी कार्यक्रमांचे आयोजन करते. यावर्षी देखिल मंगळवार ते रविवारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या भाद्रपद एकादशीला टेंबे गणपतीची स्थापना होणार तर रविवारी दि. ११ सप्टेंबर रोजी भाद्रपद प्रतिपदेस विसर्जन होणार आहे. दरम्यान, दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी वहीपेन श्रीचरणी अर्पण करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अनंतदेवा जोशी यांनी केले आहे. विसर्जनानंतर या शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.
परवानगीसाठी घोड्यावर गेले होते हैद्राबादला
सन १९०१ साली मराठवाड्यावर निजामाचे शासन होते. त्यावेळी शहरातील काही भाविकांनी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली. मात्र, मिरवणूकीस परवानगी नसल्यामुळे निजामांनी स्थापना मिरवणूक अडविली. त्यामुळे गणेश मंडळाच्या सदस्यांनी घोड्यावर थेट हैद्राबाद गाठत ताम्रपटावर स्थापना परवानगी आणली होती. तसेच १२२ वर्षांपूर्वी विजेची सोय नव्हती. विसर्जन मिरवणुकीत प्रकाश असावा म्हणून लाकडाला कापड गुंडाळुन त्यावर तेल टाकून आगीचे टेंबे तयार करण्यात आले. या टेंब्याच्या प्रकाशात मिरवणूक निघाली. हीच परंपरा आजतागायत सुरूच आहे.