१२१ वर्षांची परंपरा राखत टेंबे गणपतीची आज स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:07+5:302021-09-17T04:40:07+5:30
माजलगाव : तब्बल १२१ वर्षांची परंपरा लाभलेल्या शहरातील जोशी गल्ली येथील टेंबे गणपतीची शुक्रवारी पावणेसह वाजता विधीवत पूजा करून ...
माजलगाव : तब्बल १२१ वर्षांची परंपरा लाभलेल्या शहरातील जोशी गल्ली येथील टेंबे गणपतीची शुक्रवारी पावणेसह वाजता विधीवत पूजा करून स्थापना होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी दिली.
शहरातील टेंबे गणपतीला एक आगळी वेगळी परंपरा आहे. निजाम राजवटीत १९०१ मध्ये या गणपतीची प्रथम स्थापना करण्यात आली. तत्कालीन तांत्रिक अडचणींमुळे हा गणपती एकादशीला स्थापन होतो व प्रतिपदेला श्री विसर्जन होते. यावर्षी कोरोनाचे नियम पाळत या मंडळाने अडीच फुटांची इको-फ्रेंडली चिखल मातीची मूर्ती बनवलेली आहे. शुक्रवारी मिरवणूक न काढता विधिवत पूजा करून श्रींची स्थापना होणार आहे. भाविकांना महाआरती सोशल मीडियावर लाईव्ह करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे. भाविकांना सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था टेंबे गणेश मंडळाने केलेली आहे.
मास्कशिवाय दर्शन नाही
मंडळाने थर्मल गन, सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे. श्रींची स्थापना मिरवणूक व श्री विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. १२१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या टेंबे गणेश मंडळाने कोरोना कालावधीत गरीब, वंचित, उपेक्षित घटकातील सामान्य कुटुंबांना सलग ४५ दिवस अविरतपणे मोफत भोजन सेवा देत सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न केला. तसेच किराणा साहित्याचेही वाटप करण्यात आले. यावर्षी कोरोनामुळे देखावे व इतर कार्यक्रम होणार नसून पाच दिवस धार्मिक विधी होणार आहेत. भाविकांनी कोरोनाकाळात मंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी केले आहे.
160921\purusttam karva_img-20210916-wa0034_14.jpg