सेवत कायम करण्याच्या मागणीसाठी अस्थायी डॉक्टर संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 05:58 PM2020-11-02T17:58:16+5:302020-11-02T18:02:54+5:30
अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात ४५ डॉक्टर आजही अस्थायी स्वरुपात कार्यरत असून सेवा देत आहेत.
अंबाजोगाई - अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालाय येथील अस्थायी ४५ डॉक्टर सोमवारी संपावर गेले आहेत. या डॉक्टरांनी आपल्याला सेवेत कायम करावे या मागणीसाठी रुग्णालयातील रॅली काढली व अधिष्ठाता कार्यालयासमोर हे सर्व डॉक्टर धरणे आंदोलन करत आहेत. आज एकदम ४५ डॉक्टर संपावर गेल्याने स्वा. रा. ती. च्या रुग्णसेवेवर मोठा ताण आला आहे.
अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात ४५ डॉक्टर आजही अस्थायी स्वरुपात कार्यरत असून सेवा देत आहेत. यातील बहुसंख्य डॉक्टर हे वैद्यकीय महाविद्यालयात अस्थायी स्वरपात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वच डॉक्टरांनी कोरोनाच्या रुग्णांना उपचार देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. सेवेत कायम स्वरूपी सामावून घ्यावी, या मागणीसाठी त्यांचा सातत्यान ेलढा सुरू आहे. १५ व १६ आॅक्टोबर रोजी या अस्थायी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते. अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शनेही केली होती. या सर्व डॉक्टरांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे यासाठी लढा सुरूच आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याने सोमवार, २ नोव्हेंबरपासून हे सर्व डॉक्टर संपावर गेले आहेत. डॉक्टर संपावर गेल्यामुळे स्वा. रा.ती.मधील रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात रॅली काढली व अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने केली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना दिले आहे. जोपर्यंत शासन आपल्या मागण्या मान्य करणार नाहीत तोपर्यंत अस्थायी डॉक्टर संपावरच राहतील. असा इशारा अस्थायी डॉक्टर संघटनेचे प्रमुख डॉ. अमित लोमटे यांनी दिला आहे.