सासू रागावल्याने सुनेकडून भयंकर कृत्य; दोन चिमुकल्यांना विष पाजले, स्वतःही केले प्राशन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 07:58 PM2024-05-13T19:58:25+5:302024-05-13T20:00:35+5:30
दोन्ही मुलांचा मृत्यू, आईची प्रकृती स्थिर, अंबाजोगाई तालुक्यातील घटना
अंबाजोगाई : 'स्वयंपाक जास्त का केला' याचा सासूने जाब विचारल्याचा राग मनात धरून विवाहितेने पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना विषारी द्रव पाजले. त्यानंतर स्वतः विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून विवाहितेवर उपचार सुरू आहे. पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे शुक्रवारी रात्री घडली.
कौशल्या भीमराव दोडतले (वय २३, रा. टेकडी गल्ली, बर्दापूर) असे विवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री पती भीमराव निवडणुकीच्या सभेला गेला होता. यावेळी घरात असलेल्या सासूने स्वयंपाक जास्त का केलास असे कौशल्याला विचारले. याचा राग धरून कौशल्याने मुलगा कार्तिक (वय २) आणि मुलगी प्रांजल (वय ३) यांना खोलीत नेले. तिथे दोन्ही मुलांना विषारी द्रव पाजले. सभा संपून भीमराव घरी आल्यानंतर आईने त्याला कौशल्या रुसून खोलीत बसल्याचे सांगितले. भीमराव खोलीत गेला असता मुलांच्या नाकाला फेस आल्याचे दिसले. त्यावर मुलांच्या नाकाला व्हॅसलिन लावल्याचे कौशल्याने सांगितले.
परंतु, मुलांच्या नाकातून रक्त येत असल्याने आणि मुले काहीच हालचाल करत नसल्याने भीमरावने मुलांना खांद्यावर घेत बाहेर आणले. आरडाओरडा करून गल्लीतील लोकांना बोलावले. यावेळी कौशल्याने वरच्या खोलीत जाऊन विषारी द्रव प्राशन केले. भीमराव आणि शेजाऱ्यांनी तिघांनाही लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून कार्तिक आणि प्रांजल यांना मयत घोषित केले. तर, कौशल्यावर उपचार असून तिची प्रकृती स्थिर आहे. भीमराव दोडतले यांच्या फिर्यादीवरून पत्नी कौशल्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय ठाकूर करत आहेत.