लक्षणे असल्यास चाचणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:35 AM2021-07-28T04:35:25+5:302021-07-28T04:35:25+5:30
महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर खड्डे अंबाजोगाई : शहरातून गेलेल्या लातूरकडील महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा सर्व्हिस रस्ता ...
महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर खड्डे
अंबाजोगाई : शहरातून गेलेल्या लातूरकडील महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा सर्व्हिस रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. मुख्य रस्त्यापासून सर्व्हिस रस्त्याची उंची कमी झाली आहे. तसेच त्या बाजूने उतार झाल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठे अडथळे येत आहेत. दुचाकी चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. खराब झालेला हा सर्व्हिस रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे
माजलगाव : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही जनावरे मुख्य रस्त्यातही आजूबाजूच्या व्यापारी संकुलात घुसूनही त्या परिसरात घाण करतात. या मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे.
ज्येष्ठ नागरिकांची होतेय गैरसोय
माजलगाव : शासकीय व निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर व दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व बँकांना व आर्थिक संस्थांना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोय करण्याच्या सूचना करूनही बँकांकडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. परिणामी ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय वाढत आहे.
प्लास्टिकमुळे शेती सुपीकतेला धोका
वडवणी : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात शेणखत टाकले जाते; परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व इतर काही वस्तू असतात. त्यामुळे शेतीच्या सुपीकतेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे. प्लास्टिक जर येत असेल तर असे प्लास्टिक शेणखताजवळ ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
रेतीचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी
धारुर : तालुक्यात गेल्या दोन वर्षांत रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. पंधरा ते सोळा हजार रुपयांना मिळणारी रेतीच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किमती दुपटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.