बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:59+5:302021-03-15T04:29:59+5:30
अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची ...
अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची चाचणी करण्यात येत आहे. अंबाजोगाई येथे स्वा. रा. ती. रुग्णालयासह मंडीबाजारातील नागरी रुग्णालयातही चाचण्या करण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
हार्वेस्टद्वारे गहू काढणी
अंबाजोगाई : तालुक्याच्या ग्रामीण भागात गहू काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता काढणीसाठी मजुराची कमतरता भासू लागल्याने शेतकऱ्यांनी हार्वेस्टद्वारे गव्हाच्या काढणीला पसंती दिली आहे. त्यामुळे हार्वेस्टद्वारे गव्हाची काढणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मशिनरीज उपलब्ध झाल्या आहेत.
कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची मागणी
अंबाजोगाई - आधार लिंकिंग, अंगठ्याचा ठसा न येणे व अन्य तांत्रिक कारणामुळे अंबाजोगाई तालुक्यातील अनेक शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिले आहेत. तांत्रिक कारणांमुळे या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तट यांनी केली आहे.
शासकीय केंद्रांवर शुकशुकाट
अंबाजोगाई : हमीभावाने हरभरा व सोयाबीन खरेदीसाठी अंबाजोगाई तालुक्यात शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, बाजार समितीच्या वतीने सोयाबीनला पाच हजारांपेक्षा जास्त दर मिळू लागल्याने शेतकरी हमीभाव केंद्रापेक्षा बाजारातच आपला माल विक्री करू लागले आहेत. हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा बाजारात वाढीव मिळू लागला आहे. परिणामी शासकीय केंद्रावर शुकशुकाट जाणवू लागला आहे.