‘स्वच्छता अॅप’कडे बीडकरांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:13 AM2018-01-08T01:13:27+5:302018-01-08T01:13:38+5:30
हातात अँड्रॉईड मोबाईल असतानाही शहर स्वच्छतेसाठी उघडण्यात आलेले ‘स्वच्छता अॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास बीडकर उदासिन असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : हातात अँड्रॉईड मोबाईल असतानाही शहर स्वच्छतेसाठी उघडण्यात आलेले ‘स्वच्छता अॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास बीडकर उदासिन असल्याचे दिसून येत आहे. पालिकेकडून जनजागृती करूनही आतापर्यंत केवळ २२४५ लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. पालिकेला १ जानेवारीपर्यंत किमान ४ हजार अॅपचे उद्दीष्ट होते. फेब्रुवारी महिन्यात समिती तपासणीसाठी येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहर स्वच्छतेसाठी नगर पालिकेने पाऊले उचलली आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छता कशी करता येईल याबाबत प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशातील शहरांनी सहभाग नोंदवला आहे. गतवर्षीही हे सर्वेक्षण झाले होते. यात बीडचा ३०२ वा क्रमांक होता.
यावेळी मेहनत करण्यासाठी पालिकेला वेळ मिळाला आहे. त्यामुळे शिपायापासून मुख्याधिकारी, नगराध्यक्षांपर्यंत स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून या सर्वेक्षणांतर्गत ‘स्वच्छता अॅप’ सुरु करण्यात आले. प्रत्येकाला या अॅपद्वारे आपल्या परिसरातील तक्रारी पालिकेपर्यंत पोहचविण्याची सुविधा उपलब्ध केली.
परंतु प्रत्यक्षात बीडकरांमधून हे अॅप डाऊनलोड करण्यास अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळून येत नसल्याचे दिसून येते. १ जानेवारीपर्यंत बीड पालिकेला ४ हजार अॅप डाऊनलोडचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात केवळ २२४५ अॅप डाऊनलोड केल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
पालिकेची वारी, महाविद्यालयांच्या दारी
अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यासाठी पालिका आता महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहे. यामध्ये मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, विभाग प्रमुख व्ही. टी. तिडके, समन्वयक वसीम पठाण, स्वच्छता निरीक्षक आर. एस. जोगदंड, भारत चांदणे, भागवत जाधव, सुनील काळकुटे, ज्योती ढाका, गौरव दुधे, श्रध्दा गर्जे हे अॅप डाऊनलोडचे आवाहन करीत आहेत. तसेच अनेकांच्या घरी व दुकानांना भेटी देऊन याबाबत जनजागृती केल्याचे विभाग प्रमुख तिडके यांनी सांगितले.
गेम अन् चॅटिंगमध्ये व्यस्त
अँड्रॉईड मोबाईल हाती असतानाही स्वच्छता अॅप डाऊनलोड केले जात नाही. या अॅपमुळे आपल्याला काय फायदा आहे हे वारंवार जनजागृतीमधून सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उलट गेम अॅन् सोशल मीडियावर चॅटिंग करण्यातच बीडकर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.