तलवाडा ठाणे प्रमुखांची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:57 AM2018-07-09T00:57:45+5:302018-07-09T00:57:53+5:30
गेवराई तालुक्यातील मारफळा येथे झेंड्यावरुन झालेला वाद तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांना भोवणार आहे. एका बाजूने आलेल्या तक्रारीवर दुसऱ्या गटाची बाजू ऐकून न घेता तात्काळ कारवाई करणे त्यांच्या अंगलट येणार असल्याचे दिसत आहे.
बीड : गेवराई तालुक्यातील मारफळा येथे झेंड्यावरुन झालेला वाद तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांना भोवणार आहे. एका बाजूने आलेल्या तक्रारीवर दुसऱ्या गटाची बाजू ऐकून न घेता तात्काळ कारवाई करणे त्यांच्या अंगलट येणार असल्याचे दिसत आहे. लवकरच शेळके यांची उप विभागीय पोलीस अधिकाºयांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
मारफळा येथे झेंडा रोवणे व काढ्यावरुन दोन गटात वाद झाले होते. त्यानंतर शनिवारी हे वाद टोकाला गेले आणि दगडफेक झाली होती. परंतु शुक्रवारी रात्री मारफळा ग्रामस्थांनी झेंडा काढावा यासाठी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
सपोनि शेळके यांनी तात्काळ धाव घेत झेंडा लावणाºयांची बाजू ऐकून न घेता बंदोबस्तात झेंडा काढला होता. सकाळी हा प्रकार तांड्यावरील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांवर दगडफेक केली. यात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी मोठा फौजफाटा वेळेवर पोहचल्याने तणाव निवळला होता.
दरम्यान, शेळके यांनी कारवाईची घाई का केली ? तांड्यावरील लोकांची बाजू समजून का घेतली नाही ? झेंड्याचा वाद शेळके यांना माहीत होता का ? या सारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळेच हा वाद उद्भवल्याची चर्चा असून, वरिष्ठांनी शेळके यांचा अहवाल मागितल्याचे सूत्रांकडून समजते.
उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
नुकताच स्वीकारला तलवाडा ठाण्याचा पदभार
सपोनि मारुती शेळके यांनी नुकताच तलवाडा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेला आहे. अद्याप त्यांनी संपूर्ण परिसराची परिपूर्ण माहीती नसल्याचे समजते. तरीही एवढ्या गंभीर प्रकरणात त्यांनी कारवाईचे पाऊल तात्काळ का उचलले ? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. हीच कारवाई आता त्यांच्या अंगलट येणार असल्याचे बोलले जात आहे.
चौकशी करुन वरिष्ठांना अहवाल पाठविला जाईल
या प्रकरणात नेमके काय झाले याची सविस्तर चौकशी सुरु केली आहे. ग्रामस्थांसह पोलीस अधिका-यांची चौकशी करुन वरिष्ठांना अहवाल पाठविला जाईल. आताच यावर बोलणे उचित नाही.
- डॉ. अर्जुन भोसले
उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई
आमच्या कारवाईमुळे वाद झाला नाही
शुक्रवारी रात्री ११.३० वाजता ग्रामस्थांची तक्रार आली. त्यानंतर तात्काळ जाऊन कारवाई केली. आमच्या कारवाईमुळे वाद झाला असे म्हणता येणार नाही. आता हा चौकशीचा भाग आहे.
- मारुती शेळके
सहाय्यक पोलीस निरीक्षक, तलवाडा