शोले स्टाइल आंदोलकांना प्रशासन कंटाळले; कार्यालयासमोरील झाडच तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 05:58 PM2022-02-15T17:58:24+5:302022-02-15T18:00:40+5:30
कार्यालयासमोर लिंबाचे मोठे झाड होते. या झाडावर चढून शोले स्टाइल आंदाेलने करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले होते.
बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतत आंदोलने सुरू असतात. समोरील झाडावर चढून शोले स्टाइल आंदोलकांना खाली उतरविताना प्रशासनाची तारांबळ उडायची. त्यामुळे प्रशासनाने १३ फेब्रुवारी रोजी हे झाडच तोडून टाकले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंबाचे मोठे झाड होते. या झाडावर चढून शोले स्टाइल आंदाेलने करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले होते. अशा आंदोलकांना खाली उतरविताना पोलिसांची कसरत व्हायची. आंदोलकाला इजा पोहोचू नये म्हणून अग्निशामक यंत्र बोलावून संबंधितांची मनधरणी करावी लागत असे. या झाडास तारेचे कुंपण लावा, अशी विनंती शिवाजीनगर ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र लिहून केली होती. मात्र, प्रशासनाने हे झाडच तोडून टाकले.
दरम्यान, यावेळी काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध केला; पण आंदोलनकर्त्यांच्या जीवितास धोका ठरू नये, अशी सबब देत विरोध झुगारून झाड करवतीने मुळासह कापण्यात आले. यावेळी अरेरावी करून कामात हस्तक्षेप केल्याच्या आरोपाखाली अभिमान रामकिसन खरसाडेंवर शिवाजीनगर ठाण्यात उपनिरीक्षक बाळराजे दराडे यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास सहायक निरीक्षक भारत काळे यांच्याकडे सोपविला आहे.
चळवळीचा साक्षीदार, आंदोलकांची सावली
जिल्ह्याला आंदोलने व चळवळींचा मोठा इतिहास आहे. जिल्हा प्रशासनाने तोडलेले झाड ५० वर्षे जुने होते, अशी माहिती आहे. याच झाडाच्या सावलीखाली अनेक ऐतिहासिक आंदोलने झाली व चळवळीच्या लढ्यांना यश मिळाले. आंदोलकांना सावली देणारे हे झाड कापल्याने आंदोलनस्थळ सुनेसुने दिसत आहे.