राष्ट्रवादीकडून नरेंद्र काळेंची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती; लागलीच मिळाली अवघड मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:28 PM2022-08-24T17:28:14+5:302022-08-24T17:29:07+5:30
लागलीच सोपवली कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याच्या निरीक्षकपदाची जबाबदारी
अंबाजोगाई (बीड) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या डॉ. नरेंद्र काळे यांच्यावर पक्षाने आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. डॉ. काळे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी डॉ. काळे यांना दिले. तसेच नियुक्तीनंतर त्यांच्याकडे कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर शहर व ग्रामीण जिल्हा निरीक्षक पदाचा पदभार ही सोपविण्यात आला आहे.
अंबाजोगाई येथील डॉ. नरेंद्र काळे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर त्यांच्याकडे लातूर शहर व ग्रामीण जिल्हा निरीक्षक पदाचा पदभार ही सोपविण्यात आला आहे. या निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी डॉ. नरेंद्र काळे यांना दिले. डॉ. काळे यांना पक्ष संघटना बांधणीचा मोठा अनुभव आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. काळे यांच्या नियुक्ती महत्वपूर्ण मानली जात आहे.
डॉ. काळे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष, दंत परिषदेचे सदस्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसमिती, विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कार्य केले आहे. सर्व स्तरातून डॉ. काळे यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.