अंध पित्याला मुलाने बसस्टॅण्डवर सोडले,मात्र मुलीने स्वीकारले;आता शेवटचा श्वास जावयाच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:00 PM2023-04-04T13:00:35+5:302023-04-04T13:04:39+5:30

तीन वर्षांपूर्वी पुण्याच्या बसस्टॅण्डवर बेवारसपणे मुलाने पित्याला सोडून दिले होते.

The blind father is rejected by the son, but accepted by the daughter; Now last breath is at son-in-law's home | अंध पित्याला मुलाने बसस्टॅण्डवर सोडले,मात्र मुलीने स्वीकारले;आता शेवटचा श्वास जावयाच्या घरी

अंध पित्याला मुलाने बसस्टॅण्डवर सोडले,मात्र मुलीने स्वीकारले;आता शेवटचा श्वास जावयाच्या घरी

googlenewsNext

शिरूर कासार (जि. बीड) : तालुक्यातील निराश्रित, गरीब, वृद्ध अपंग अशा उपेक्षितांना सांभाळ करणाऱ्या आजोळ परिवारात तीन वर्षांपासून ९७ वर्षीय आजोबा आश्रयाला होते. नातेवाइकांची शोधमोहीम सुरूच होती. अखेर मुलाचा पत्ता सापडला. संपर्क करून वडिलांना घेऊन जा, असे सांगितले. परंतु त्या एकुलत्या एक मुलाने पित्यास नाकारले. यानंतर दुसऱ्या नातेवाइकांचा शोध सुरू केल्यावर आजोबांच्या मुलीचा शोध लागला. मुलीला हकिकत सांगितली आणि तिने पित्याला स्वीकारले. रविवारी ती आजोबांना घरी घेऊन गेली.

तीन वर्षांपूर्वी पुण्याच्या बसस्टॅण्डवर बेवारसपणे मुलाने पित्याला सोडून दिले होते. मात्र अंध असल्याने बसस्टॉपवर असलेल्या काही माणुसकी जिवंत असणाऱ्यांनी विचारणा केली असता मला माजलगावच्या गाडीत बसून द्या, अशी विनंती केली. त्यांनी आजोबांना तिकीट काढून गाडीत बसवून दिले. तेव्हापासून अंध आजोबा बसस्टॅण्डवरच असायचे. मिळेल ते खायचे. तिथेच कोपऱ्यात झोपायचे. अशावेळी माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्यामराव देशमुख यांच्या माध्यमातून त्यांना आजोळ परिवारात आणले.

आजोबाच्या नातेवाइकांचे शोधकार्य सुरू झाले. मुलाचा पत्ता मिळाला. त्यांच्याशी संपर्क केला मात्र तो एकुलता एक मुलगा स्पष्टपणे नकार देऊन मोकळा झाला. हताश न होता आजोळ परिवाराचे संचालक कर्ण तांबे यांनी प्रयत्न करून दुसरे नातेवाईक शोधले. त्यानंतर ५७ वर्षीय सीता शिंदे या मुलीने आपल्या बापाचा स्वीकार केला आणि ती स्वत: येऊन रविवारी खराडी पुणे येथे घेऊन गेली.

सीता बनली वडिलांचा आधार
मुलाने नाकारले. एका मुलीने तर माझा नंबर ‘आजोळ’ला देऊच नको, असे सीताला खडसावले. मात्र सीताने आपल्या वडिलांच्या आधाराची काठी होण्याचा निश्चय केला. आता ते आजोबा जावयाच्या घरी सुखाने शेवटचा श्वास घेणार आहेत. हा सर्व प्रवास आई, वडिलांना निश्चित काही शिकवून जातो. अशी वेळ कुण्याही मुलाने जन्मदात्यावर आणू नये. त्यांची सेवा करा, निश्चित चांगले फळ मिळेल, असे आवाहन आजोळ परिवाराचे संचालक कर्ण तांबे यांनी केले.

Web Title: The blind father is rejected by the son, but accepted by the daughter; Now last breath is at son-in-law's home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.