पाय घसरून तलावात पडलेल्या भाविकाचा १२ तासानंतर सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:37 PM2024-09-09T12:37:00+5:302024-09-09T12:38:26+5:30
पैठणच्या गोताखोर पथकाच्या सहकार्याने पोलिसांनी घेतला शोध
- नितीन कांबळे
कडा- सावरगाव येथे दर्शनासाठी आलेला एक भाविक अंघोळीसाठी गेल्यानंतर पाय घसरून तलावात पडल्याने बुडाल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजता घडली होती. पोलिसांना पैठणच्या गोताखोर पथकच्या सहकार्याने १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह सापडण्यात यश आले. रविंद्र आबासाहेब इंगळे असे मृत भाविकाचे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील रविंद्र आबासाहेब इंगळे (३२) हा शनिवारी गावातील दिंडीसह आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान मायंबा येथे दर्शनासाठी आला होता. रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान दोन मित्रांसह जवळच असलेल्या एका तलावावर तो अंघोळीसाठी गेला होता. अचानक पाय घसरून तो तलावात पडला. पोहता येत नसल्याने रवींद्र पाण्यात बुडाला. हा प्रकारे सोबत असलेल्या मित्रांनी दिंडीप्रमुख व देवस्थान विश्वस्त समितीला सांगितल्यानंतर बचाव कार्य सुरू झाले.
माहिती मिळताच अंभोरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.अनेकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण शोध लागला नसल्याने पैठण येथील गोताखोर पथकाला पाचारण करण्यात आले. तब्बल १२ तासानंतर बुडालेला मृतदेह बाहेर काढण्यात पैठणच्या पथकाच्या सहकार्याने पोलिसांना यश आले.