सहा दिवसांपासून बेपत्ता तरूणाचा अखेर नदीपात्रात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:18 PM2022-11-01T19:18:44+5:302022-11-01T19:18:58+5:30
पाय घसरून नदीत बुडाल्यानंतर पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज
कडा ( बीड) : मागील सहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा अखेर कडी नदीपात्रात आज मृतदेह आढळून आला. बिभीषण अशोक पवार ( ३७ ) असे मृत तरूणाचे नाव आहे. पाय घसरून नदीत बुडाल्यानंतर पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव येथील बिभीषण अशोक पवार हा मागील बुधवारी कामानिमित्त कडा येथे आला होता. त्यानंतर तो गायब होता. नातेवाईकांनी बिभीषणचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, सहा दिवसानंतर आज सकाळी नदीपात्रातील झाडाझुडपात विभीषणचा मृतदेह आढळून आला. मृताचा भाऊ अमृतने आष्टी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, पोलिस नाईक संतोष नाईकवाडे आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.
पोहता येत नसल्याने झाला असावा मृत्यू
मृतदेह कुजलेला असल्याने कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. कडा येथून घरी परत येताना कडी नदी पार करताना पाय घसरल्याने बिभीषण पाण्यात बुडाला असावा. तसेच पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृताच्या पश्चात वडील-भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे.