ढगफुटी सदृश्य पावसाने नदीवरील पूल गेला वाहून; दोन गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 07:17 PM2022-08-08T19:17:12+5:302022-08-08T19:17:24+5:30
दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजला आहे
माजलगाव (बीड) : तालुक्यातीत दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने उमरी येथील सरस्वती नदीवरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळा, रामेश्वर विद्यालय ,आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्यासह दोन गावाचा संपर्क तुटला आहे.
तालुक्यात अनेक गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजला असून या पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. यामुळे गेल्या आठ दिवसापासून परिसरामध्ये विज गायब झाली आहे. त्याचबरोबर अनेक पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे . रविवार रोजी रात्री सरस्वती नदीवरील पूल वाहून गेल्याने उमरी येथील जिल्हा परिषद शाळा, रामेश्वर विद्यालय ,पशुवैद्यकीय दवाखाना ,आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायतसह दोन गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे शाळेत विद्यार्थी घेऊन जाण्यासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे.
हा पूल गेल्या अनेक दिवसापासून मोडकळीस आला होता.रविवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पूल वाहून गेला आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता या पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.