महिलांच्या खांद्यावरच ‘कुटुंब कल्याण’चा भार; राज्यातील पुरुषांचे प्रमाण केवळ अडीच टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 04:20 PM2022-05-26T16:20:07+5:302022-05-26T16:20:48+5:30

कोरोना काळात निम्म्याने घटल्या शस्त्रक्रिया

The burden of 'family Planning' falls on the shoulders of women; The proportion of males in the state is only two and a half per cent | महिलांच्या खांद्यावरच ‘कुटुंब कल्याण’चा भार; राज्यातील पुरुषांचे प्रमाण केवळ अडीच टक्के

महिलांच्या खांद्यावरच ‘कुटुंब कल्याण’चा भार; राज्यातील पुरुषांचे प्रमाण केवळ अडीच टक्के

googlenewsNext

- सोमनाथ खताळ
बीड :
छोटे कुटुंब, सुखी कुटुंबासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु याची सर्व जबाबदारी महिलांच्याच खांद्यावर असल्याचे समोर आले आहे. राज्यात ९७ टक्के महिला कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया करत असून नसबंदी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण अवघे अडीच टक्के आहे. यावरून सर्व भार महिलांवरच टाकला जात असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच कोरोना काळात अशा शस्त्रक्रिया निम्म्याने घटल्या आहेत.

हम दो हमारे दो, छोटे कुटुंब सुखी कुटुंब रहावे, तसेच माता व बालमृत्यू थांबावेत, यासाठी आरोग्य विभागाने कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविणे सुरू केले. महिलांची शस्त्रक्रिया तर पुरुषांची नसबंदी करून छोटे कुटुंब संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु यासाठी पुरूष नकारात्मक असल्याचे समोर आले आहे. मागील पाच वर्षांतील राज्याची माहिती घेतली असता केवळ अडीच टक्के पुरुषांनी नसबंदी केली आहे तर महिलांचा आकडा हा ९७ टक्के एवढा आहे. मागील आठवड्यात पुण्यात संचालकांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वच माता व बालसंगोपन अधिकाऱ्यांसह बाह्य निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता.
कोरोना काळात घटल्या शस्त्रक्रिया

राज्यात २०१७-१८ साली ४ लाख २१ हजार ५०९ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्याच कोरोना काळात म्हणजेच २०१९-२० मध्ये ३ लाख ७१ हजार व २०२०-२१ मध्ये २ लाख ११ हजार ७७३ एवढ्यावर आल्या होत्या. नंतर २०२१-२२ मध्ये २ लाख ८० हजार ७७९ एवढ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता कोरोना कमी झाल्याने शस्त्रक्रियांचा आकडा वाढू लागला आहे.

निरोधच्या वापरातही घट
कोरोना काळात निरोधच्या वापरातही मोठी घट झाली आहे. २०१७-१८ साली ३ लाख ६ हजार १८७ लोकांनी निरोध नेले होते. कोरोना काळात २०२०-२१ मध्ये ही संख्या २ लाख २९ हजार ९३२ एवढी संख्या होती. आता पुन्हा संख्या वाढू लागली आहे. गतवर्षात पावणे तीन लाख लोकांनी निरोध नेले आहेत.

गर्भनिरोधक गोळ्यांचाही वापर
जनजागृती आणि उपाययोजनांमुळे गर्भनिरोधक गोळ्यांचा वापरही वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी २ लाख ४२ हजार महिलांनी ही गोळी नेली होती. कोरोनात आकडा २ लाख २७ हजारांवर गेला होता. परंतु गतवर्षी त्यात वाढ होऊन २ लाख ४६ हजार इतक्यावर तो पोहचला आहे.

राज्यातील वर्षनिहाय शस्त्रक्रियांची आकडेवारी
वर्ष महिला पुरूष
२०१७-१८ - ४,०९,९१७ - ११,५९२
२०१८-१९ - ३,९०,६३३ - ८,६९८
२०१९-२० - ३,६२,६८४ - ९,०५८
२०२०-२१ - २,०६,४९७ - ५,२७६
२०२१-२२ - २,७३,३९८ - ७,३८१

Web Title: The burden of 'family Planning' falls on the shoulders of women; The proportion of males in the state is only two and a half per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.