घरफोड्या करणारा दुचाकी चोरीकडे वळाला, तिसऱ्याच दिवशी पोलिसांना मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:43 PM2022-04-23T19:43:11+5:302022-04-23T19:43:26+5:30
शेख आशपाक शेख आसेफ हा सराईत गुन्हेगार असून घरफोड्या करण्यात तो एक्सपर्ट आहे. त्याच्यावर ९० पेक्षा अधिक घरफाेड्यांचे गुन्हे नोंद
बीड: घरफोड्या करण्यात हातखंडा असलेल्या गुन्हेगाराने नशेत गुन्हेगार मित्राच्या संगतीने दुचाकी चोरी केली. मात्र, चोरलेल्या दुचाकीसह तिसऱ्याच दिवशी त्यास पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला १९ एप्रिल रोजी यश आले. शेख आशपाक शेख आसेफ (४०, माेहमदिया कॉलनी, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील स्वराज्यनगरातून १६ एप्रिल रोजी योगेश भारत नाईक (२५) यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच २३ एव्ही- २८९६) घरासमोरून लंपास झाली होती. याप्रकरणी १९ रोजी नाईक यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, शेख आशपाक शेख आसेफ हा चोरीच्या दुचाकीसह बार्शी रोडवरील एका लॉन्ससमोर उभा असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, हवालदार मनोज वाघ, रामदास तांदळे, पो.ना. प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड यांचे पथक रवाना केले. यावेळी सापळा रचून शेख आशपाक यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने अक्षय ऊर्फ चिंट्या मिठू गायकवाड (रा. पात्रूड गल्ली, बीड) याच्यासमवेत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दुचाकीसह शेख आशपाक यास शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. २० रोजी शिवाजीनगर पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात झाली. दरम्यान, अक्षय ऊर्फ चिंट्या गायकवाड हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी सांगितले.
परभणी पोलिसांनी घेतला ताबा
दरम्यान, शेख आशपाक याने परभणी जिल्ह्यात मोठी घरफोडी केली होती. तपासात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यामुळे परभणी पोलिसांनी त्याचा ताबा मागितला. न्यायालयाच्या परवानगीने त्यास परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून तेथील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
घरफोड्यांचे ९० गुन्हे
शेख आशपाक शेख आसेफ हा सराईत गुन्हेगार असून घरफोड्या करण्यात तो एक्सपर्ट आहे. त्याच्यावर ९० पेक्षा अधिक घरफाेड्यांचे गुन्हे नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली. अक्षय ऊर्फ चिंट्या गायकवाड व तो चांगले मित्र असून त्यांना नशा करण्याची सवय आहे. नशेत असतानाच स्वराज्यनगरात पायी फिरताना मध्यरात्री त्यांनी दुचाकी लंपास केली होती.