डॉक्टरचा मृतदेह शोधकार्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी धरणात उतरले; आरोग्यदूत गमावल्याने ग्रामस्थ शोकाकुल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:59 PM2022-09-19T12:59:35+5:302022-09-19T13:01:00+5:30
माजलगावच्या धरणात पोहायला गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू
माजलगाव (बीड) : येथील माजलगाव धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ (वय ४५) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. २४ ताप उलटूनही डॉ. फपाळ यांचा मृतदेह सापडला नव्हता. दरम्यान, बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा हे देखील शोधमोहिमेत सहभागी झाले असून बोटीतून तळ्यात उतरले आहेत.
तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचे तेलगाव येथे खासगी रुग्णालय आहे. ते गेल्या काही दिवसांपासून माजलगाव येथे वास्तव्यास होते. रोज सकाळी माजलगाव धरणामध्ये पोहायला जात असत. नेहमीप्रमाणे रविवारी ते पोहायला गेले होते. पोहत पोहत ते पाण्यात लांब गेले व पोहत परत येताना दम लागल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
दरम्यान, शोधाशोध करण्यात आली. मच्छिमारांनीदेखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही तास उलटूनदेखील त्यांचा मृतदेह सापडला नाही. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी तहसीलदार वर्षा मनाळे यांनी भेट दिली व परळी येथील पथकाला पाचारण करण्यात आले. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध सुरूच होता. घटनास्थळी माजलगाव शहर पोलिसांनी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावला होता. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
जिल्हाधिकारी स्वतः उतरले तळ्यात
कोल्हापूरवरून आलेली पाणबुडीची टीम शोध कार्य करत आहे. दरम्यान, बीड जिल्हाधिकारी स्वतः शोधकार्यात सहभागी झाले असून बोटीतून तळ्यात उतरले आहेत. डॉ. फपाळ यांचा मृत्यू मास्यांसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून झाल्याची एक शक्यता वर्तवली जात आहे.
आरोग्यदूत गमावल्याने ग्रामस्थ शोकाकुल
माजलगाव व धारूर तालुक्यातील ग्रामीण भागात डॉ. दत्ता फपाळ यांनी आरोग्यसेवा दिली आहे. त्यामुळे आज आमच्या हक्काचा आरोग्यदूत गमावल्याच्या भावना व्यक्त करत ग्रामस्थ शोकाकुल झाले आहेत. मोठ्याप्रमाणावर ग्रामस्थ तळ्यावर गर्दी करून आहेत.