बीडमध्ये गुलालमुक्त गणेश विसर्जनाची संकल्पना; मंडळे म्हणाली, आम्ही फुले उधळणार
By सोमनाथ खताळ | Published: September 26, 2023 02:21 PM2023-09-26T14:21:06+5:302023-09-26T14:22:08+5:30
पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद : १६४ गणेश मंडळांकडून गुलाल मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास सहमती
बीड : गुलालामुळे सामाजिक सलोखा बिघडतो. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुचविलेली गुलालमुक्तीची संकल्पना सर्वांना आवडत आहे. स्थानिक पोलिसांकडूनही समज, गैरसमज समजावून सांगितले जात आहेत. त्यामुळेच १६४ मंडळांनी यावर्षीचा गणेशोत्सव गुलालमुक्त साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वाजविणार आहेत. आम्ही गुलालाऐवजी फुले अन् पाकळ्या गणेश मूर्तीवर उधळणार आहोत. आपणही असेच करावे, असा सल्ला गुलालमुक्त उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी इतरांनी दिला आहे.
लाडक्या गणरायाचे १९ सप्टेंबर रोजी आगमन झाले. जिल्ह्यात १५९२ ठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली. बाप्पाचे आगमन दणक्यात झाले. दोन दिवसांपासून पावसानेही हजेरी लावल्याने गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे आता विसर्जनाचीही तयारी मंडळांकडून केली जात आहे. देखाव्यांसह सजावटीचे नियोजन केले जात आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासन, पोलिसांचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष बंदोबस्तासह रस्ते चकाचक केले जात आहेत. परंतु, याच विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात होते. याच गुलालावरून आतापर्यंत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर याच गुलालात केमिकल, कचखडी, बारीक कण असल्याने अवयव आणि आरोग्यासही घातक ठरू शकतात. हाच धागा पकडून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी यावर्षीचा गणेशोत्सव गुलालमुक्त साजरा करण्याचा निर्णय घेतला. गुलालाऐवजी फुले, पाकळ्या उधळा असे आवाहन त्यांनी केले. याला मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १६४ मंडळांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. हा आकडा आणखी वाढेल, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.
पेठबीडसह ६ ठाणेदारांचे अपयश
एसपी ठाकूर यांची संकल्पना यशस्वी करण्यासाठी २८ पैकी २२ ठाणेदारांनी विशेष परिश्रम घेतले. मंडळांच्या नावासह त्यांनी यादी विशेष शाखेला पाठविली. परंतु, बीड शहरातील सर्वांत महत्त्वाचा आणि संवेदनशील असलेल्या पेठबीड पोलिसांकडून एकाही मंडळाचे समुपदेशन झाले नाही. त्यासोबतच बीड ग्रामीण, वडवणी, अंमळनेर, नेकनूर, पिंपळनेर यांचा समावेश आहे. या ठाण्यांच्या हद्दीत एकानेही सहमती दर्शवली नाही. हे ठाणेदार मंडळांशी संवाद ठेवण्यात अपयशी ठरले की यादी पाठविण्यास उशीर झाला, हा प्रश्न आहे.
काय म्हणतात मंडळांचे पदाधिकारी....
गुलालमुक्तची संकल्पना आवडली
मागील ५० वर्षांपासून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहोत. सलोख्यासाठी पोलिसांनी सुचविलेली गुलालमुक्तची संकल्पना आम्हाला आवडली. याचे फायदे, तोटेही आम्हाला समजावून सांगितले. त्यामुळेच गुलालाऐवजी फुले अन् पाकळ्यांचा वापर करू.
- गणेश शेळके, सिद्धेश्वर गणेश मंडळ, माजलगाव
फुले उधळणार
गुलालामुळे वाद होतात, हे खरे आहे. त्यामुळेच पोलिसांच्या संकल्पनेला आम्ही सहमती दर्शवली. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुलालाऐवजी फुले उधळणार. तसेच, डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वाजवू.
-सचिन घाटे, गरूडा गणेश मंडळ, केसापुरी कॅम्प
आनंदोत्सव शांतता, शिस्तीत असावा
गुलालामुळे अनेक ठिकाणी वाद होतात. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. आनंदोत्सव करावा, याला आमची सहमती आहे. परंतु, तो शांतता आणि शिस्तीत असावा. आम्ही डीजे व गुलालमुक्तची संकल्पना हाती घेतली. सर्व ठाणेदारांना सूचना देऊन जनजागृती करण्यास सांगितले. याला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आतापर्यंत सहमती दर्शविणाऱ्या मंडळांची संख्या १६४ झाली आहे. पुढे आणखी हा आकडा वाढेल, असा विश्वास आहे. ही संकल्पना सत्यात उतरली तर जिल्हा आदर्श ठरेल, यात दुमत नाही.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड