वैद्यनाथ मंदिरात शिवभक्तांची गर्दी उसळली, स्पर्शदर्शन होत असल्याने भाविकांत समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:43 PM2024-08-05T12:43:20+5:302024-08-05T12:50:35+5:30
हर हर महादेव जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला
- संजय खाकरे
परळी: देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी उसळली आहे. श्रावण मासारंभानिमित्त हर हर महादेव, ओम नमः शिवायचा जप करीत श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे आज पहिल्या सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत पाऊण लाख भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले आहे.
देवस्थान ट्रस्टच्यावतीने सेक्रेटरी प्रा. बाबासाहेब देशमुख आणि अर्चना बाबासाहेब देशमुख या दांपत्याने आज पहाटे दीड वाजता वैद्यनाथास लघु रुद्राभिषेक केला. त्यानंतर सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत भाविकांचे वैद्यनाथास अभिषेक झाले. रात्री बारा वाजल्यापासून वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. धर्मदर्शन व पासधारक अशा स्वतंत्र दोन रांगा लागल्या आहेत. धर्मदर्शनमध्ये पाच तास थांबून वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. मंदिरात शिवलिंगाचे स्पर्श दर्शन होत असल्याने भावीक समाधान व्यक्त करत आहेत.
पहिला श्रावण सोमवार असल्याने राज्य व राज्यातून मंदिरात दर्शनासाठी राज्य व परराज्यातून शिवभक्त मोठ्या प्रमाणात आले आहेत. देवस्थान ट्रस्टने मंदिर पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेटची सोय केल्याने हजारो भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले आहे. मंदिरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून ट्रस्टचे खाजगी सुरक्षा कर्मचारी देखील तैनात आहेत.
हर हर महादेव जयघोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर दुमदुमला, पहिल्या श्रावण सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांची मंदिरात गर्दी #beed#shravanmaaspic.twitter.com/02hd3G7Ars
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 5, 2024
हर हर महादेव जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला
वैद्यनाथ मंदिरासमोरील पंचमुखी महादेव मंदिर व संत जगमित्र नागा मंदिर येथेही दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. परळीपासून जवळ असलेल्या जिरेवाडी येथील सोमेश्वर मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली आहे. वैद्यनाथ मंदिर रोडवर बिल्व पत्र, पेढे घेण्यासाठी भाविक गर्दी करीत असून धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आलेल्या पेढे विक्रेत्यांनी पेढ्याचे स्टॉल टाकले आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी नाथ प्रतिष्ठानच्यावतीने साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, पाणी पाऊचचे वाटप करण्यात येत आहे.
पाच तास लागणे दर्शनास
धर्मदर्शन रांगेत पाच तास थांबून श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शन घेतले. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्री वैद्यनाथाचे स्पर्श दर्शन करता आले. याचे आपल्याला समाधान लाभले
-सुरेखा अरुण तपके, भाविक परळी.
दर्शनासाठी भाविकांचा ओघ
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्री वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून रात्री बारा ते सकाळी अकरापर्यंत ७५ हजार भाविकांनी दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढत चालला आहे.
-राजेश देशमुख, विश्वस्त वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी.
भाविकांसाठी तीन क्विंटल साबुदाण्याची खिचडी
कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्यावतीने मंदिरात फुलांची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, पाणी पाऊचचे वाटप करण्यात येत आहे. भाविकांसाठी तीन क्विंटल साबुदाण्याची खिचडी बनविण्यात आली आहे
- नितिन कुलकर्णी, सचिव, नाथ प्रतिष्ठान परळी