शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 05:36 PM2022-05-09T17:36:55+5:302022-05-09T17:37:19+5:30

भानकवाडी येथील दोरखडा शेतशिवारात दुपारी वाघूरीत बिबट्या अडकल्याची वार्ता परिसरात पसरली

The death of a leopard trapped in a hunter's net; Incident in Bhanakwadi Shivara | शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना

शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना

Next

शिरूर कासार : तालुक्यातील भानकवाडी दोरखडा शेत शिवारात शिकाऱ्याने लावलेल्या वाघूरीत (जाळ्यात) अडकल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदरील घटनेबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भानकवाडी येथील दोरखडा शेतशिवारात दुपारी वाघूरीत बिबट्या अडकल्याची वार्ता परिसरात पसरताच सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे व वनरक्षक बद्रीनाथ परजने, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे, डॉ. अशोक गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे यांना बिबट्या जाळ्यात अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे हे घटनास्थळी दाखल झाले.

वाघूरीत (जाळ्यात) अडकलेल्या बिबट्याची व जागेची पाहणी आणि पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बोरघरे मॅडम, डॉ. प्रदीप आघाव, डॉ. मोहळकर, डॉ. लकडे यांना बोलावून घेत जागेवरच इन कॅमेरा बिबट्याचे शवविच्छेदन केले. विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यावर पिपळवंडी ता. पाटोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे, वनपाल साधू धसे, वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे, वनरक्षक बद्रीनाथ परजने, शेळके, शिवाजी आघाव आदी वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिकारींकडे दुर्लक्ष नको
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ९ प्रमाणे वनरक्षक बद्रीनाथ परजणे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व साधू धसे हे करत आहेत. भानकवाडी दोरखडा शेतशिवारात झालेल्या बिबट्याच्या मृत्यूमुळे वनक्षेत्रात वन्यजिवांची शिकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढे वनविभागाला सतर्क राहावे लागणार आहे.

Web Title: The death of a leopard trapped in a hunter's net; Incident in Bhanakwadi Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.