उपचाराअभावी बोकडाचा मृत्यू, संतापलेल्या शेतकऱ्याने तेच बोकड टांगले दवाखान्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 10:44 PM2024-02-08T22:44:31+5:302024-02-08T22:44:41+5:30
केज तालुक्यातील आंधळेवाडी येथील शहादेव आंधळे यांनी आठ महिन्यांपूर्वी शेळीपालनासाठी विडा येथील मराठवाडा ग्रामीण बँकेकडून १ लाख रुपये कर्ज घेतले होते.
मधुकर सिरसाट
केज : आजारी बोकडाला विडा येथील पशू दवाखान्यात वेळेवर उपचार मिळाले नाही. त्याने ओरडून ओरडून जीव सोडला. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने मृत बोकडच थेट पशू दवाखान्याच्या गेटला टांगून संताप व्यक्त केला. ही घटना विडा येथे गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. टांगलेले मृत बोकड पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
केज तालुक्यातील आंधळेवाडी येथील शहादेव आंधळे यांनी आठ महिन्यांपूर्वी शेळीपालनासाठी विडा येथील मराठवाडा ग्रामीण बँकेकडून १ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यातून नेकनूरच्या बाजारातून ७ शेळ्या व १ बोकड खरेदी केला. आंधळेवाडी शिवारात गुरुवारी दुपारी शेळ्या चारत असताना चार महिन्यांचा बोकड अचानक ओरडू लागला. बोकडाचा आवाज बंद होत नसल्यामुळे आंधळे यांनी त्याला विडा येथील पशू रुग्णालयात आणले. परंतु, दवाखान्याच्या गेटला कुलूप होते. शिपाई दुपारी २ वाजताच दवाखाना बंद करून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान, काही वेळातच बोकडाचा मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकाऱ्याला उत्तरीय तपासणी फोन केला असता 'उद्या सकाळी तुमच्या घरी येऊन बोकडाची उत्तरीय तपासणी करण्यात येईल' असे उत्तर मिळाले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने बोकड दवाखान्याच्या गेटला बांधून निषेध नोंदविला. उपचाराअभावी बोकडाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे आठ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, विडा येथील पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त असून मस्साजोगचे पशुधन विकास अधिकारी येथील अतिरिक्त पदभार सांभाळतात, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. श्रीकृष्ण थळकरी यांनी दिली.
पशुधन विकास अधिकारी सहलीला
परळी, अंबाजोगाई व केज तालुक्यातील शेतकऱ्यांची सहल कामधेनू योजनेअंतर्गत परभणी येथे गेली होती. यात मीदेखील आहे. त्यामुळे रुग्णालयात येऊ शकलो नाही. शिपाई शेजारच्या गावात जनावरांवर उपचारासाठी गेलेला होता. त्यामुळे पशू रुग्णालय बंद होते. -डॉ. दीक्षांत जोगदंड, प्रभारी पशुधन विकास अधिकारी, विडा